राजकारणातून आपण निवृत्त होणार नसून, आगामी निवडणुका माझ्याच नेतृत्वाखाली होतील, असे केंद्रीय कृषिमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी बुधवारी सांगली येथे पत्रकार बैठकीत सांगितले. राज्य मंत्रिमंडळात करण्यात आलेले बदल आगामी निवडणुका नजरेसमोर ठेवूनच केले असून, मंत्रिमंडळातून वगळलेल्या मंत्र्यांवर पक्षाची जबाबदारी सोपविण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. 
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मंत्र्यांमध्ये बदल केल्यानंतर पवार पहिल्यांदाच पत्रकारांशी संवाद साधत होते. ते म्हणाले, लोकसभा निवडणुकीसाठी आपण उमेदवारी दाखल करणार नसलो तरी, राजकारणात मात्र सक्रिय राहणार आहे. राजकारणातून निवृत्ती घेण्याचा माझा कोणताही विचार नाही.
आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुका नजरेसमोर ठेवून पक्षीय पातळीवर बदल करणे आवश्यक वाटले. त्यामुळेच राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये बदल करण्यात आले आहेत. काही ज्येष्ठ कार्यकर्त्यांनी लोकसभा निवडणूक लढविण्याची इच्छाही व्यक्त केली असून, त्याचाही विचार या पाठीमागे आहे. विधानसभा निवडणुका माझ्याच नियंत्रणाखाली होतील, असेही त्यांनी या वेळी सांगितले.