राज्य सहकारी बँक घोटाळाप्रकरणी सक्तवसुली संचलनालय शरद पवारांसह अन्य लोकांविरुद्ध दाखल केलेल्या गुन्ह्य़ाचे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक, माजी खासदार राजू शेट्टी यांनी स्वागत केले आहे.

या गुन्ह्य़ाच्या चौकशीबरोबरच या काळातच अनेक साखर कारखान्यांची कवडीमोल दराने झालेल्या खेरदीविRीच्याही चौकशीचा पुनरुच्चार शेट्टी यांनी केला. या खरेदी-विक्रीमध्ये हजारो कोटी रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचा आरोप शेट्टी यांनी केला आहे. शेट्टी  काँग्रेस आघाडीबरोबर असून त्यांनीच या कारवाईचे समर्थन केले आहे.

राजू शेट्टी हे गेली काही वर्षे दोन स्तरावरील गैरव्यवहार विरोधात लढा देत आहेत. राज्यात १० हजार कोटी रुपयांचे साखर कारखाने अवघ्या एक हजार कोटी रुपयांमध्ये विकल्याचा गंभीर आरोप शेट्टी यांनी उच्च न्यायालयात याचिकेद्वारे केला आहे. तसेच, सहकारी संस्थांनी नियमबाह्य़ कर्ज पुरवठा केल्याप्रकरणी कारवाई केली जावी, असा दुसरा मुद्दाही ते सातत्याने मांडत आहेत.

महाराष्ट्र राज्य सहकारी बँक घोटाळाप्रकरणी ईडीकडून शरद पवार यांच्यासह अजित पवार यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.  या घोटाळ्याबाबत सर्वप्रथम याचिका दाखल करणारे शेट्टी यांनी ईडीकडून झालेल्या कारवाईचे स्वागत केले आहे. राज्य बँकेत झालेल्या घोटाळ्याबद्दल ज्यांनी भ्रष्टाचार केला आहे, त्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे, असे मत शेट्टी यांनी व्यक्त केले आहे. तसेच राज्य सहकारी बँकेच्या संचालकांवर गुन्हा दाखल झाला असला, तरी ज्यांनी कर्ज घेतले ते मोकाटच आहेत. कर्ज घेतलेल्या अनेकांनी सध्या भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे या भाजपवासींवरही कारवाईची मागणी शेट्टी यांनी केली आहे.