खुर्च्याची तोडफोड; आरोप-प्रत्यारोप

जळगाव : युती होणार की नाही, यावरून भाजप-सेनेत आधीच तणावाची स्थिती निर्माण झाली असताना, जिल्ह्य़ात शिवसेनेचे राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांच्या पाळधी गावात भाजपच्या मेळावास्थळी रविवारी मध्यरात्री खुर्च्याची तोडफोड करण्यात आली. या घटनेस शिवसेनेचे मंत्री कारणीभूत असल्याचा आरोप भाजपने केला आहे. या घटनेमुळे सेना-भाजपमधील वाद पुन्हा उफाळून आला आहे.

सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांच्या कार्यकर्त्यांनी हा गोंधळ घातल्याचा आरोप भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी केला. धरणगाव तालुक्यातील पाळधी येथील साईबाबा मंदिर परिसरात सोमवारी जळगाव ग्रामीणमधील भाजपचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. रविवारी मध्यरात्री पूर्वतयारीचे काम सुरू असताना काही जणांनी येऊन खुर्च्याची तोडफोड केली. स्वयंपाक तयार करणाऱ्यांना मारहाण केल्याची तक्रार पोलिसात करण्यात आली आहे.

भाजपचे माजी तालुकाध्यक्ष सुभाष पाटील यांनीही गुलाबराव पाटील हे कायमच भाजपवर अन्याय करत आले आहेत. परंतु यापुढे आम्ही अन्याय सहन करणार नाही, असा इशारा दिला आहे. दरम्यान, राज्यमंत्री पाटील यांनी भाजपच्या आरोपांचे खंडन केले. सेना-भाजपमधील वादाच्या पाश्र्वभूमीवर, पाळधी येथे पोलिसांनी बंदोबस्त तैनात केला आहे.

भाजपची टीका

रविवारी मध्यरात्री पूर्वतयारीचे काम सुरू असताना काही जणांनी येऊन खुर्च्याची तोडफोड केली. स्वयंपाक तयार करणाऱ्यांना मारहाण केल्याची तक्रार पोलिसात करण्यात आली आहे. मेळाव्याची तयारी उधळण्यामागे गुलाबराव पाटलांचे कार्यकर्ते असल्याचा आरोप भाजप नेते पी. सी. पाटील यांनी केला.

युतीमधील कोणतेही कार्यकर्ते असे काम करणार नाही. तसेच ज्या लोकांनी खुर्च्याची तोडफोड केली, त्यांनी ‘स्टंटबाजी’साठी हा प्रकार केला आहे. – गुलाबराव पाटील (सहकार राज्यमंत्री)