महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा काही दिवसांवर येऊन ठेपली असतानाच सोलापूर जिल्ह्यात अकलूजसारख्या परिसरात पैलवान मंडळींना ‘ मेफेन टरमाईन ‘नावाच्या उत्तेजक इंजेक्शन्सची सर्रास बेकायदेशीर विक्री होत असल्याचा धक्कादायक प्रकार उजेडात आला आहे. त्याचे लोण महाराष्ट्रात कोठे कोठे पोहोचले आहे, याची कसून चौकशी होण्याची मागणी पुढे येत आहे.

हेही वाचा- उर्फी जावेद प्रकरण तापलं, चित्रा वाघ यांना महिला आयोगाची नोटीस; चाकणकर म्हणाल्या, “दोन दिवसांत…”

सोलापूरच्या अन्न व औषध प्रशासनाने अकलूजसह परिसरातील चौघा औषध विक्रेत्यांविरूध्द फौजदारी कारकाई केली असून त्यांच्या औषध दुकानांचे परवानेही रद्द केले आहेत. दीपक विजयकुमिर फडे (रा. यशवंतनगर, अकलूज), मनोज पोपट जाधव, रमेश बाबासाहेब नाईक (दोघे रा.वेळापूर) आणि नाना बाळू बनसोडे (रा. श्रीपूर, ता. माळशिरस) अशी अकलूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालेल्या औषध विक्रेत्यांची नावे आहेत. अन्न व औषध प्रशासन विभागाच्या सोलापुरातील हंगामी औषध निरीक्षक अरूण गोडसे (रा. सातारा) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार भारतीय दंड संहिता कलम २७६, ३३६, ३२८, ४२०, ४६८, ३५ अन्वये अकलूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. यासंदर्भात भाजपचे जिल्हा संघटक सचिव तथा ज्येष्ठ क्रीडा संघटक धैर्यशील मोहिते-पाटील यांनी गेल्याच महिन्यात शासनाकडे तक्रार केली होती. यात मेफेन टरमाईन सल्फेट इंजेक्शन्सची बेकायदेशीर विक्री आणि कुस्तीचा सराव करणाऱ्या पैलवानांसाठी या उत्जेक औषधांचा गैरवापर होत असल्याची गंभीर बाब मोहिते-पाटील यांनी निदर्शनास आणून दिली होती.

हेही वाचा- “परत सांगतोय नारायण राणे माझ्या नादाला लागू नकोस, तुझ्यासारखे…” संजय राऊतांनी एकेरी भाषेत व्यक्त केला संताप!

या पार्श्वभूमीवर अन्न व औषध प्रशासनातील औषध निरीक्षक एस. ए. कांबळे यांनी काही औषध दुकानांची तपासणी केली असता त्यात असा प्रकार समोर आला आहे. गेल्या ५ डिसेंबर रोजी अकलूजमध्ये दीपक फडे यांच्या दीपक मेडिकल ॲन्ड जनरल स्टोअर्स या औषध दुकानाची अचानक तपासणी केली असता तेथे मेफेन टरमाईन इंजेक्शन्सचा मोठा साठा सापडला होता. तालमीत कुस्तीचा आणि व्यायामाचा सराव करणाऱ्या पैलवानांना या औषध दुकानातून या इंजेक्शन्सची मोठ्या प्रमाणावर विक्री तज्ज्ञ डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय आणि विना बिलाने केल्याचे दिसून आले होते. या उत्तेजक औषधांच्या विक्रीचे लोण श्रीपूर येथील बाळू बनसोडे यांचे साई मेडिकल स्टोअर्स व इतरांच्या औषधा दुकानांपर्यंत पोहोचल्याचे आढळून आले. ही औषधे सोलापुरातील गूडविल फार्मा आणि लक्ष्मी एन्टरप्रायझेसकन खरेदी केल्याचेही आढळून आले.

मेफेन टरमाईन हे इंजेक्शन संबंधित औषध विक्रेत्याकडून जास्तीत जास्त ३०० रूपाये दराने डॉक्टर खरेदी करतात. या इंजेक्शन्सची विक्री तज्ज्ञ डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय आणि अधिकृत बिलाशिवाय करता येत नाही. सध्या काळ्या बाजारात हे इंजेक्शन दीड हजार रूपयांपर्यंत मिळते. तज्ज्ञ डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार मेफेन टरमाईन इंजेक्शन्सचा वापर आॕपरेशन थिएटरमध्ये रूग्णांसाठी तोसुध्दा कमी प्रमाणात केला जातो. या औषधाचा अतिवापर झाल्यास व्यक्तीच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होण्याची भीती असते. हे इंजेक्शन्स घेतल्याने शरीरातील रक्तदाब वाढतो आणि कुस्तीसारख्या खेळात पैलवानाचा दम टिकून राहतो. शरीर थकत नाही. मनातील भीती किंवा न्यूनगंड कमी होतो. खेळात यश मिळण्याची मानसिकता निर्माण होते.

हेही वाचा- योगी आदित्यनाथ मुंबईत आले अन् ५ लाख कोटींची गुंतवणूक घेऊन गेले, बड्या उद्योगपतींनी दिली आश्वासनं!

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सोलापुरात अन्न व औषध प्रशासनाकडून मेफेन टरफाईन इंजेक्शन्सची बेकायदेशीर विक्री पैलवानांसाठी सर्रासपणे होत असल्याचा प्रकार उजेडात आला असला तरी हे हिमनगाचे टोक असल्याचे जाणकार मंडळी सांगतात. विविध क्रीडा स्पर्धांमध्ये अलिकडे डोपिंगची कीड लागली आहे. महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा महाराष्ट्राचे कुस्ती वैभव मानली जाते. परंतु ही मानाची स्पर्धा तोंडावर असतानाच पैलवानांसाठी उत्तेजक औषधे बेकायदेशीररीत्या आणि सहजपणे उपलब्ध होऊ लागली आहेत. त्यामुळे महाराष्ट्र केसरी कुस्तीच्या तोंडावर डोपिंग घेणारी अपप्रवृत्तीचा शिरकाव झाल्याचे बोलले जाते. त्यामुळे आता प्रत्येक कुस्ती स्पर्धेच्या अगोदर डोपिंग चाचणीची मागणी होत आहे.