राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांविषयी केलेल्या वादग्रस्त टिप्पणीमुळे संपूर्ण महाराष्ट्रात संताप व्यक्त केला गेला. हे प्रकरण ताजे असतानाच आता भाजपाचे आमदार तथा मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडाची तुलना छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आग्र्यातील सुटकेशी केली आहे. याच कारणामुळे आता पुन्हा एकदा विरोधकांनी आक्रमक पवित्रा धारण केला आहे. सत्ताधाऱ्यांनी बेताल व्यक्तव्यं करून नयेत, असा सल्ला विरोधकांकडून दिला जातोय. याच प्रकरणावर माजी मंत्री तथा उद्धव ठाकरे गटातील नेते आदित्य ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. शिवरायांशी तुलना करणे म्हणजे हिंदुत्व नव्हे, हा तर महाराष्ट्राचा द्वेष आहे, असे आदित्य ठाकरे म्हणाले आहेत.

हेही वाचा >>> शिवेंद्रसिंहराजेंनी उधळली एकनाथ शिंदेंवर स्तुतीसुमनं, म्हणाले “मतांचा कोणताही विचार न करता…”

आदित्य ठाकरे यांनी ट्वीट करून शिंदे गटावर टीका केली आहे. ‘इमान विकलेल्या गद्दारांची तुलना छत्रपती शिवरायांशी करणं हे हिंदुत्व नाही. हा महाराष्ट्र द्वेष आहे! ‘महाराष्ट्राचं खच्चीकरण’ हेच या खोके सरकारचं ध्येय आहे!’ असे आदित्य ठाकरे आपल्या ट्वीटमध्ये म्हणाले आहेत.

अजित पवार यांनी खडसावलं

मंलप्रभात लोढा यांनी शिंदे यांची तुलना शिवाजी महाराज यांच्याशी केल्यानंतर विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी नाराजी व्यक्त केली आहे. “आग्र्यात छत्रपती शिवाजी महाराजांना ज्या ठिकाणी ठेवलं होतं, त्याची आणि एकनाथ शिंदेंच्या घटनेशी तुलनाच होऊ शकत नाही. एकनाथ शिंदेंना कुणी बंदी केलं होतं? एकनाथ शिंदे हे सभागृहात गटनेते होते. २०१४ मध्ये त्यांना विरोधी पक्षनेतेपद दिलं होतं. त्यांच्यावरच सगळी जबाबदारी होती,” असं अजित पवार म्हणाले.

हेही वाचा >>> CM शिंदेंची शिवरायांशी तुलना करणाऱ्या मंगलप्रभात लोढांविरुद्ध संभाजी ब्रिगेड आक्रमक; म्हणाले, “मूग गिळून…”

मंगलप्रभात लोढा काय म्हणाले होते?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“छत्रपती शिवाजी महाराजांना औरंगाजेब बादशाहने आग्र्यात कैद करुन ठेवलं होतं. पण, शिवाजी महाराज हिंदवी स्वराज्याच्या निर्मितीसाठी बादशाहच्या हातावर तुरी देऊन तिथून निसटले. एकनाथ शिंदे यांनाही रोखण्याचे प्रयत्न करण्यात आले. मात्र, एकनाथ शिंदे हे देखील महाराष्ट्रासाठी तिकडून ( महाविकास आघाडी ) बाहेर पडले,” असे मंगलप्रभात लोढा म्हणाले.