Ajit Pawar on Walmik Karad: बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात सात आरोपींना अटक झाली असून त्यांच्यावर मकोका दाखल करण्यात आला होता. मात्र खंडणी प्रकरणी अटकेत असलेल्या वाल्मिक कराडवरही मकोका दाखल करण्यात यावा, अशी मागणी गेल्या काही दिवसांपासून केली जात होती. संतोष देशमुख यांचे कुटुंबियांनीही यासाठी आक्रमक पवित्रा घेतला होता. त्यानंतर आज वाल्मिक कराडवर मकोका दाखल करण्यात आला असून त्याला १४ दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत पाठविण्यात आले आहे. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माध्यमांना प्रतिक्रिया देताना सदर कारवाईवर समाधान व्यक्त केले.

काय म्हणाले अजित पवार?

माध्यमांशी बोलताना अजित पवार म्हणाले, “मुख्यमंत्री आणि आम्ही आधीच ठरवले होते की, या प्रकरणात हायगय न करता कुणालाही सोडायचे नाही. जे दोषी असतील, जे कुणी संबंधित असतील, ते कुणीही असले तरी त्यांच्यावर कारवाई करायची. या घटनेला महिना होऊन गेला, त्यामुळे संतोष देशमुख यांचे कुटुंबिय चिंतेत होते. पण पोलीस, न्यायालय, एसआयटी त्यांच्या पद्धतीने काम करत आहेत. संतोष देशमुख यांची अतिशय निर्घृण पद्धतीने हत्या झाली. शिव-शाहू-फुले-आंबेडकर यांच्या महाराष्ट्रात अशी घटना कुणीच खपवून घेणार नाही. कुणीही दोषी असले तरी त्यांचे धागे-दोरे चौकशीत मिळाले, तर त्यांच्यावर कारवाई केली जाणार आहे.”

परळी बंदबाबत केले भाष्य

वाल्मिक कराडला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावल्यानंतर परळीत कराड समर्थक आक्रमक झालेले पाहायला मिळत आहेत. यावर प्रतिक्रिया विचारली असता अजित पवार म्हणाले की, बीड जिल्ह्यात अतिशय सक्षम असे पोलीस अधीक्षक दिले गेले आहेत. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी राजकीय दबावाला झुगारून काम करण्याच्या सूचना त्यांना दिलेल्या आहेत.

मकोका दाखल केल्यानंतर भाजपाचे आमदार सुरेश धस यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, कोणत्या गुन्ह्यात मकोका दाखल केला, याची मला माहिती नाही. पण संतोष देशमुख यांच्या हत्येमध्ये जे जे सहभागी असतील त्यातील कुणालाच सोडणार नाही, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत. त्यामुळे इतर आता कुणाच्या मागण्यांना काही अर्थ नाही. एसआयटीने नियमाप्रमाणे कडी जोडलेली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

धनंजय देशमुख यांनी समाधान व्यक्त केले

संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनीही मकोका दाखल झाल्यानंतर माध्यमांना प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, माझ्या भावाच्या हत्येमधील जे जे आरोपी आहेत, त्या सर्वांना शिक्षा झाली पाहीजे. या गुन्ह्यात जे जे आरोपी आहेत, त्यांच्यावर ३०२ आणि मकोकाचा गुन्हा दाखल व्हावा. मुख्यमंत्री आणि एसआयटी योग्य दिशेने काम करत असून त्यावर आमचे समाधान आहे.