सांगली : आमदार रोहित पवारांचे गावकी की भावकी, जयंत पाटलांचे अखेरपर्यंत निकराचा लढा आणि या साऱ्याला उत्तर देताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ‘बोलवायचं अन् बिनपाण्यानं करायचं’ या वक्तव्याने शनिवारी इस्लामपूरचा कार्यक्रम चिमटे आणि शालजोडीतील भाषणांनी चांगलाच गाजला.
इस्लामपूरमध्ये महात्मा फुले शिक्षण संस्थेच्या प्रा. एन.डी. पाटील विधी महाविद्यालय, श्रीमती सरोज नारायण पाटील माई मानसशास्त्र संशोधन केंद्र आणि प्रा. एन.डी. पाटील बहुउद्देशीय सभागृह उद्घाटन सोहळा शनिवारी संपन्न झाला. या समारंभास उपमुख्यमंत्री अजित पवार, पालकमंत्री चंद्रकांत पाटील, आ. रोहित पवार, आ. जयंत पाटील, आ. अरूण लाड, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष निशिकांत पाटील, शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्कें, अण्णा डांगे, प्राचार्या अर्चना थोरात आदी उपस्थित होते.
प्रारंभी श्रीमती पाटील यांनी स्वागत करताना अजित वरून कठीण दिसत असला तरी तो नारळासारखा असल्याचे सांगत आमच्या घरावर संकट आले की, तो मदतीला धावून येत असल्याचे म्हणाल्या. आमदार रोहित पवारचे कौतुक करताना त्या म्हणाल्या, रोहित आता धीट झाला आहे. चांगली भाषणे करू लागला असून, तो एनडींची जागा घेईल, असे वाटते. पालकमंत्री पाटील व आमदार जयंत पाटील यांनीही आपल्या संस्थेच्या विकासात मोलाची मदत केल्याचा उल्लेख त्यांनी केला.
दरम्यान, आमदार पवार यांनी बोलताना जोरदार राजकीय फटकेबाजी केली. अजितदादा आता गावकीचा विचार करतात. मात्र, भावकीला विसरतात असे सांगत शासकीय निवासस्थान सोडत नसलेल्या धनंजय मुंडे यांच्यावरही तोफ डागली. ते म्हणाले की मंत्रीपद गेले तरी काहीजण बंगला सोडत नाहीत. मात्र, त्यांनी एनडी पाटलांकडून आदर्श घ्यावा, असे ते म्हणाले. पालकमंत्री पाटील यांचे कौतुक करताना म्हणाले, दादा तुम्ही भाजपचे खरंच सोनं आहात. मात्र, आताच्या काळातील काही बेन्टेक्स खालच्या थराला जाऊन बोलत आहेत. त्यामुळे या बेन्टेक्सच काय करायचं, याबाबत भाजपच्या सोन्याने ठरवायला हवे, असे सांगत आमदार गोपीचंद पडळकर यांच्याकडून पवार कुटुंबाला लक्ष्य केले जात असल्याकडे त्यांनी मंत्री पाटील यांचे लक्ष वेधले.
यावेळी आमदार पाटील म्हणाले, वाळवा तालुका हा स्वाभिमानी तालुका आहे. यामुळे तो सहजासहजी झुकत नाही, भूमिका बदलणार नाही. स्वातंत्र्य लढ्यावेळी परकीय सत्तेशी लढा देण्याचा क्रांतीकारकांचा हा तालुका असल्याने हा स्वाभिमानाचा इतिहास इथल्या मातीला, लोकांना आहे. यामुळे घाबरणारा हा तालुका नाही. कितीही फंदफितुरी झाली तरी इथली माणसं स्वाभिमानाने राहतात. एन.डी. पाटील यांनी कधी विचार सोडला नाही. भूमिका बदलली नाही. अखेरपर्यंत निकराने लढा द्यायचा, ही शिकवण त्यांची आहे. सत्ता इकडून तिकडे गेली तरी त्यांनी विचारात बदल केला नाही. हाच या तालुक्याचा इतिहास आहे.
या राजकीय टीकाटिप्पणीनंतर बोलताना उपमुख्यमंत्री पवार म्हणाले, रोहितने दोघेजण हेलिकॉप्टरने कार्यक्रमास येणार असल्याचे सांगितले होते. त्यावेळी दोघेही माझे भाषण ऐकायला येणार नाहीत, असे वाटले होते. मात्र, दोघेही आले. गावकी-भावकीचा संदर्भ घेत माझ्या नादाला लागू नको, भावकीकडे लक्ष दिले म्हणून तो आमदार झाला. शाहू, फुले, आंबेडकर यांच्या विचारधारेवर आम्ही चालत आहोत, त्यात कुठेही तडजोड करणार नाही. आ. पाटील यांंच्या आवाजात प्रेमळपणा, देखणेपणा असल्याच्या उल्लेखावर ते म्हणाले, आम्ही काय देखणे नाही का? वाळव्याला बोलावयाचे आणि बिनपाण्याने आमचीच करायची हे बरं हाय का? असा चिमटाही त्यांनी आ. पाटील यांना काढला.
यावेळी विद्यार्थ्यांना उद्देशून बोलताना ते म्हणाले, सरकारने कृत्रिम बुद्धीमत्तेसाठी ५०० कोटींची तरतूद केली आहे. गरज भासल्यास हिवाळी अधिवेशनात आणखी तरतूद करता येईल. तरुणांनी याचा फायदा घेत आपला शैक्षणिक विकास साधावा, असे आवाहनही त्यांनी केले.