अलिबाग: पोलादपूरहून महाबळेश्वरकडे जाणारा आंबेनळी घाट अवजड वाहनांसाठी महिनाभर बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. रात्रीच्या वेळी आणि अतिवृष्टीच्या काळात सर्व प्रकारची वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे. रायगडचे जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी याबाबतची अधिसूचना जारी केली. त्यामुळे कोकणातून महाबळेश्वरकडे जाणारा महत्वाचा मार्ग बंद झाला आहे.
काही दिवसांपूर्वी अंबेनळी घाटात मोठी दरड कोसळल्याने हा मार्ग पाच दिवसांसाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. आता मात्र १५ ऑगस्ट पर्यंत या मार्गावरील अवजड वाहनासाठी बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. गेल्या काही दिवसात या मार्गावर सात ते आठ ठिकाणी दरडी कोसळल्या आहेत. महाबळेश्वर खोरे आणि पोलादपूर परिसरात पावासाचा जोर वाढला असल्याने, या मार्गावर दरडी कोसळण्याच्या घटनामध्ये वाढ झाली आहे.
या पार्श्वभूमीवर रायगडचे जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी प्रवाश्यांच्या सुरक्षेचे कारण देत पावसाळा संपेपर्यंत अवजड वाहतुकीसाठी हा मार्ग बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच हवामान विभागाकडून पावसाचा रेड आणि ऑरेंज अलर्ट असलेल्या काळात हलक्या वाहनांसाठी या मार्गावरील वाहतूक बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
महाडचे पोलादपूर प्रांताधिकारी कार्यालय आणि रायगड पोलीसांनी यांच्या विनंतीनंतर याबाबतची वाहतूक अधिसूचना त्यांनी जारी केली आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग आणि पोलीसांना या आदेशाची तातडीने अंमलबजावणी करण्याचे निर्देशही दिले आहेत. शनिवार आणि रविवारी या मार्गावर वाहनांची मोठी गर्दी असते, त्यामुळे मार्गावरील वाहतुकीचा वेग मंदावतो, शिवाय जवळपास ४० किलोमीटरचा हा घाट रस्ता अत्यंत दर्गम भागातून जातो, घाटात ठिकठिकाणी खोल दऱ्या आणि नागमोडी वळणं आहेत.
अशा वेळी अतवृष्टीमुळे दरडी कोसळल्यास मोठी जिवित हानी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आंबेनळी घाटातील वाहतुकीवर जिल्हाधिकारी यांनी निर्बंध आणले आहेत. त्यामुळे कोकणातून आंबेनळी घाटातून महाबळेश्वरला जाण्याचा प्लॅन करत असाल, तर हवामानाचे अंदाज तपासूनच जा आणि रात्रीचा प्रवास टाळा असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
आंबेनळी घाटातील वाहतुक माणगाव ताम्हिणी घाट मार्गे, पुणे, साताराकडे वळवली जाणार आहे. तर कोल्हापूरकडे जाणारी वाहतूक चिपळूण-पाटण- सातारा- कोल्हापूर मार्गे वळवली जाणार आहे.