मुळा-प्रवरा सहकारी वीज संस्थेतील कामगारांच्या थकीत देय रकमेबाबत तातडीने मुंबई येथे बैठक बोलावून हा प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले.
बावनकुळे गुरुवारी शिर्डी येथे आले होते. या वेळी विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांच्या नेतृत्वाखाली संस्थेचे अध्यक्ष अण्णासाहेब म्हस्के, उपाध्यक्ष सचिन गुजर व कामगारांच्या प्रतिनिधींनी संस्थेच्या आणि कामगारांच्या प्रश्नांबाबत निवेदन सादर केले.
मुळा-प्रवरा ही संस्था लोकसहभागातून वीज वितरण क्षेत्रात चांगले काम करत असल्याने वीज वितरण कंपनीप्रमाणेच राज्य सरकारने या संस्थेस आíथक साहाय्य करावे, स्वस्तातील वीज उपलब्ध करण्यास तसेच भांडवली कामासंदर्भात सहकार्य करावे, अशा मागण्या या वेळी करण्यात आल्या. संस्थेतील कामगारांबाबत राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयापैकी ८७ कोटी रुपयांची रक्कम अद्यापही कामगारांना मिळालेली नाही. ती तातडीने मिळावी, अशी मागणी या वेळी करण्यात आली.
दोन्ही शिष्टमंडळांच्या मागण्या बावनकुळे यांनी समजून घेत सर्व मागण्यांबाबत तातडीने मुंबई येथे सविस्तर बैठक घेण्याची तयारी दर्शवली. मुंबईतील बैठकीत कामगारांच्या प्रश्नावर सकारात्मक निर्णय घेऊ असे आश्वासन त्यांनी दिले. संस्थेच्या वतीने या वेळी बावनकुळे यांचा सत्कार करण्यात आला.