Baba Siddique Shot Dead : राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे नेते आणि माजी मंत्री बाबा सिद्दीकी ( Baba Siddique ) यांची हत्या शनिवारी म्हणजेच दसऱ्याच्या दिवशी रात्री ९ च्या सुमारास करण्यात आली. बाबा सिद्दीकी ( Baba Siddique ) वांद्रे या ठिकाणी असलेल्या त्यांच्या मुलाच्या कार्यालयात चालले होते. त्यावेळी तीन जणांनी त्यांच्यावर गोळीबार केला. या प्रकरणात गुरनैल सिंह आणि धर्मराज कश्यप या दोघांनाही अटक करण्यात आली होती. यातल्या धर्मराजने तो अल्पवयीन असल्याचा दावा केला होता. ज्यानंतर त्याची ऑसिफिकेशन चाचणी म्हणजेच वय निश्चितीसाठीची हाडांची चाचणी करण्यात आली. ज्यात तो अल्पवयीन नाही हे समोर आलं आहे.
बाबा सिद्दीकींची हत्या करणाऱ्या दोन आरोपींना न्यायालयात करण्यात आलं हजर
बाबा सिद्दीकी ( Baba Siddique ) यांची हत्या करणाऱ्या दोन आरोपींना रविवारी न्यायालयात हजर करण्यात आलं होतं. त्यापैकी गुरनैल सिंह या आरोपीला न्यायालयानं २१ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती. मात्र, दुसरा आरोपी धर्मराज कश्यप अल्पवयीन असल्याचा दावा आरोपीच्या वकिलांनी कोर्टात केला होता. आरोपी धर्मराज कश्यपचे वय १७ वर्षांचं आहे. त्यामुळे त्याच्यावर अल्पवयीन आरोपी म्हणून खटला चालवावा. वयाच्या खात्रीसाठी वैद्यकीय चाचणीस आम्ही तयार आहोत, असा दावा आरोपींच्या वडिलांनी केला होता. त्यानंतर आरोपीचं खरं वय तपासण्यासाठी न्यायालयानं ऑसिफिकेशन चाचणी करण्याचे निर्देश दिले होते.
धर्मराज कश्यप हा आरोपी अल्पवयीन नसल्याचं समोर
बाबा सिद्दीकींची ( Baba Siddique ) हत्या करणारा आरोपी धर्मराज कश्यप याची ऑसिफिकेशन टेस्ट करण्यात आली. वय निश्चित करण्यासाठी ही एक प्रकारची हाडांची चाचणी आहे. या चाचणीचा अहवाल समोर आल्यानंतर आरोपी धर्मराज कश्यप हा अल्पवयीन नाही हे सिद्ध झालं आहे. चाचणीचा अहवाल आल्यानंतर आरोपी धर्मराज कश्यपला पुन्हा कोर्टात हजर करण्यात आलं. त्यानंतर न्यायालयानं त्यालाही २१ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. PTI या वृत्तसंस्थेने ही माहिती दिली आहे.
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात आणखी एकाला अटक
बाबा सिद्दीकी यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. या घटनेनं संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. या प्रकरणात दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. तर इतर दोन आरोपी फरार आहेत. दरम्यान, आता याप्रकरणी फेसबुक पोस्ट करणाऱ्या शुभम लोणकर नावाच्या एका संशयित आरोपीच्या भावाला पुण्यातून अटक करण्यात आली आहे. प्रवीण लोणकर (२८) असं या आरोपीचं नाव आहे. दोघेही भाऊ बाबा सिद्दीकी यांच्या हत्येच्या कटात सहभागी असल्याचा आरोप त्यांच्यावर आहे.
शनिवारी रात्री झालेल्या गोळीबाराच्या घटनेनंतर या हत्येची जबाबदारी स्वीकारणारी एक फेसबुक पोस्ट ‘शुबू लोणकर महाराष्ट्र’ या फेसबूक पेजवरून शेअर करण्यात आली होती. त्यानंतर पोलिसांकडून त्याचा शोध घेतला जात होता. शुबू हा अकोला जिल्ह्याच्या अकोट येथील शुभम रामेश्वर लोणकर आहे, अशी माहिती पुढे आली होती. या दृष्टीने पोलीस तपास करत होते.