मनोज जरांगे पाटील दुसऱ्यांदा उपोषणाला बसल्यानंतर राज्यात अनेक ठिकाणी मराठा आंदोलक आक्रमक झाले होते. राज्य सरकारने दिलेला शब्द न पाळल्याने जरांगे पाटील यांना पुन्हा एकदा उपोषणाला बसावं लागलं होतं. त्यावेळी बीड, जालना, धाराशिव, छत्रपती संभाजीनगर या भागात मराठा आंदोलनाने हिंसक वळण घेतलं होतं. आक्रमक झालेल्या जमावाने प्रामुख्याने बीडमध्ये मोठ्या प्रमाणात जाळपोळ आणि तोडफोड केली. त्यामुळे कोट्यवधी रुपयांचं नुकसान झालं. बीडमध्ये राष्ट्रवादीचे नेते जयदत्त क्षीरसागर यांच्या घरावर आणि कार्यालयावर हल्ले झाले. त्यापाठोपाठ त्यांचा पुतण्या आणि आमदार संदीप क्षीरसागर यांचं घर जाळण्याचा प्रयत्न झाला. राष्ट्रवादीचे आमदार प्रकाश सोळंके यांच्या घराबाहेरील वाहनं जाळण्यात आली. या घटनांनंतर बीड पोलिसांनी अनेक आरोपींवर कारवाई केली. अजूनही ही कारवाई चालू आहे.

आमदार संदीप क्षीरसागर यांनी सांगितलं की, त्यांच्या घरावर झालेला हल्ला हा मराठा आंदोलकांनी केला नव्हता. तर आमदार रोहित पवार म्हणाले, हा हल्ला बाहेरून आलेल्या गुंडांच्या टोळ्यांनी केला होता. या टोळ्यांकडून दगडफेक आणि जाळपोळ घडवून आणण्यात आली होती. तसेच या टोळ्यांनी पेट्रोल बॉम्ब, तसेच फॉस्फरस बॉम्ब वापरले होते. सामान्य आंदोलकांकडे हे बॉम्ब कुठून येणार असा प्रश्नही अनेकांनी उपस्थित केला होता. दरम्यान, या प्रकरणातील प्रमुख आरोपी गोरख उर्फ पप्पू शिंदे याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. तसेच त्याला न्यायालयाने चार दिवसांची पोलीस कोठडीदेखील सुनावली आहे. पप्पूने हल्लेखोरांना पोट्रोल पुरवल्याचा त्याच्यावर आरोप आहे.

बीडमधील हिंसाचारप्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत ६६ गुन्हे नोंदवले असून २५४ आरोपींना ताब्यात घेतलं आहे. त्यापैकी पप्पू अनेक दिवसांपासून फरार होता. त्याला पोलिसांना पकडलं आहे. दरम्यान, या पप्पू शिंदेचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे यांच्याबरोबरचे काही फोटो राष्ट्रवादीच्या नेत्यांनी समाजमाध्यमांवर शेअर केले आहेत. राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष महबूब शेख यांनी हे फोटो एक्स या मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्मवर शेअर केले आहेत.

हे ही वाचा >> मराठा आरक्षणाबाबत छगन भुजबळांच्या भूमिकेचं मुख्यमंत्री शिंदेंकडून समर्थन; म्हणाले, “जुन्या कुणबी नोंदींची…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

महबूब शेख यांनी पप्पू शिंदेचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदेंबरोबरचे फोटे शेअर करत म्हटलं आहे की, बीड जाळपोळ आणि हिंसाचार प्रकरणातील आरोपी पप्पू शिंदे यांचे फोटो पाहून भाजपा नेत्यांनी सांगावे की, बीडच्या हिंसाचारात कोणाचा हात आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे की खासदार श्रीकांत शिंदे?