अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन २२ ते २४ एप्रिलदरम्यान उदगीरला

औरंगाबाद : उदगीर येथील ९५ व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाध्यक्षपदी भारत सासणे यांच्या नावावर रविवारी महामंडळाच्या बैठकीत शिक्कामोर्तब करण्यात आले. नागपूर, मुंबई, पुणे औरंगाबाद या सर्व घटक मंडळांकडून आलेल्या नावांवर चर्चा झाल्यानंतर काही मिनिटांतच सासणे हेच अध्यक्ष होतील, असे ठरविण्यात आले.

अध्यक्षपदासाठी घटक संस्थांकडून प्रवीण दवणे, रामचंद्र देखणे, तारा भवाळकर व अनिल अवचट यांची नावेही चर्चेत होती. यातील अनिल अवचट यांनी आपला विचार अध्यक्षपदासाठी केला जाऊ नये, असे कळविले होते. त्यांचे नाव छत्तीसगडहून त्यांच्या चाहत्याने सुचविले होते. तसेच िहडता-फिरता अध्यक्ष असावा, असा सूर होता़  त्यामुळे सासणे यांचे नावच योग्य असल्याचे सर्वाचे मत असल्याने सासणे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या उदयगिरी महाविद्यालयास ६० वर्षे पूर्ण होत असल्याने आयोजनाचा मान मिळावा अशी विनंती करण्यात आली होती. ती मान्य करण्यात आली. लातूर जिल्ह्यात अखिल भारतीय साहित्य संमेलन व्हावे अशी काँग्रेसचे दिवंगत नेते विलासराव देशमुख यांचीही इच्छा होती. ती तेव्हा पूर्ण झाली नाही; पण आता ती पूर्ण होणार असल्याचा आनंद असल्याचे साहित्य संमेलन आयोजनात पुढाकार घेणारे रामचंद्र तिरुके यांनी सांगितले. येत्या काही दिवसांत संयोजन समितीच्या बैठकीत स्वागताध्यक्ष पदाचाही निर्णय घेतला जाणार आहे. नाशिकच्या तुलनेत उदगीर येथे येणाऱ्या पाहुण्यांची गैरसोय होणार नाही. पण कर्नाटक आणि आंध्र प्रदेशाच्या सीमेवरील गावात होणारे हे पहिले संमेलन चांगले होईल, असेही तिरुके म्हणाले. साहित्य संमेलनात कोणत्या विषयावर परिसंवाद व्हावेत याविषयीही रविवारी  झालेल्या बैठकीत चर्चा झाली, दोन दिवसांत निमंत्रणपत्रिकेचा मसुदा तयार करून उदगीर येथील संयोजकांना दिला जाणार आहे. दीर्घ कथांमध्ये अधिक प्रभावी लिखाण करणारे सासणे यांची प्रशासकीय कारकीर्दही मोठी आहे. प्रशासकीय व्यवस्थेतून माणसांच्या मनाचा तळ शोधणारे लिखाण सासणे यांनी केले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, परीक्षांच्या तारखांचा विचार करून २२ ते २४ एप्रिलदरम्यान उदगीर संमेलन होईल, असे अखिल भारतीय साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील यांनी सांगितले.