सोलापूर : सोलापूर शहरात महारेलमार्फत आसरा चौकातील रेल्वे दुपदरी उड्डाणपुलाच्या कामाचा दोन वर्षांपूर्वी मुहूर्त लागला होता. केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्गमंत्री नितीन गडकरी यांनी ३ जून २०२३ रोजी त्याचे भूमिपूजनही केले होते. परंतु नंतर गेल्या दोन वर्षात या कामाची एकसुध्दा वीट हलली नाही. त्यानंतर पुन्हा दुसऱ्यांदा या उड्डाणपणाच्या कामाचे भूमिपूजन बुधवारी भाजपचे स्थानिक आमदार सुभाष देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले.

होटगी रोड आणि जुळे सोलापूर भागाला जोडणारा आसरा चौक रेल्वे उड्डाणपूल नेहमीच वर्दळीचा ठरतो. वाढत्या वर्दळीमुळे या उड्डाणपुलाचे दुपदरीकरण होण्यासाठी आमदार सुभाष देशमुख यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्गमंत्री नितीन गडकरी यांच्याकडे पाठपुरावा केला होता.‌ त्यानुसार दोन वर्षांपूर्वी या कामासाठी ३२ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला होता. त्यानुसार गडकरी यांच्याच हस्ते या उड्डाणपुलाच्या कामाचे भूमिपूजनही झाले होते. त्याप्रमाणे ३२० मीटर लांबीच्या या उड्डाणपुलाच्या कामाचे कंत्राट सीएस कन्स्ट्रक्शन इंडिया प्रा. लि. कंपनीला मिळाले होते. हे काम ४५० दिवसांत पूर्ण करावयाचे होते. परंतु हा संपूर्ण कालावधी उलटून गेला तरी प्रत्यक्षात उड्डाणपुलाचे काम अद्यापि सुरू झाले नाही.

या उड्डाणपुलाचे दुपदरीकरण करताना प्रामुख्याने सोलापूर महापालिकेच्या जलवाहिनीचा अडथळा येणार होता. ही जलवाहिनी स्थलांतरित करण्यासाठी सुमारे १२ कोटी रुपयांचा खर्च येणार होता. मात्र महापालिका प्रशासनाने त्याची जबाबदारी घेण्यास नकार दिला होता. त्यानंतर रेल्वे प्रशासनानेही हात वर केले होते. या पार्श्वभूमीवर आमदार सुभाष देशमुख यांनी राज्य सरकारकडून १२ कोटी रुपये निधी उपलब्ध होण्यासाठी पाठपुरावा सुरू केला असता तेथेही विलंब झाला. त्यामुळे आसरा चौक उड्डाणपुलाचे काम दोन वर्षांपासून पूर्ण रखडले होते.‌

दरम्यान, आमदार सुभाष देशमुख यांनी जलवाहिनी हस्तांतरित न करता उड्डाणपूल कसे उभारता येईल, यासाठी रेल्वे, महापालिका, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण प्रशासन आणि महारेल यांच्या बैठका घेतल्या.‌ शेवटी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याच सूचनेनुसार जलवाहिनी न हलवता उड्डाणपूल उभारण्याचे ठरले. त्याप्रमाणे अखेर या उड्डाणपुलाच्या या उड्डाणपुलाच्या दुपदरीकरणाच्या कामाला पुन्हा दुसऱ्यांदा मुहूर्त लागला. त्याचे भूमिपूजन अर्थात आमदार सुभाष देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले. हे काम मुदतीत पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.