कर्जत: महावितरणच्या ठेकेदार कंपनीच्या अभियंत्याला मारहाण केल्याच्या आरोपावरून भाजपचे पदाधिकारी शहाजीराजे भोसले यांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्यासह सात ते आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या संदर्भात ठेकेदार कंपनीचे स्थापत्य अभियंता वसीम नौशाद शेख (रा. भिगवण) यांनी फिर्याद दिली आहे.
कर्जत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राशीन येथील राजे वस्ती येथे महावितरणच्या प्रकल्पाचे काम रॅम्सन सोलर पल्स या ठेकेदार कंपनीमार्फत सुरू आहे. या कामातील १२ टक्के कमिशन मागणी करून देत नाही म्हणून भाजपचे शहाजी राजेभोसले, युवराज राजेभोसले, गुटाळ (पूर्ण नाव नाही) व आणखी सात ते आठ अनोळखी युवक तेथे आले. त्यांनी काम बंद पाडले, तसेच प्रकल्पाच्या साहित्याची जेसीबी यंत्राने नासधूस केली. सीसीटीव्ही कॅमेऱ्याची तोडफोड केली व दोन कॅमेरे घेऊन गेले. दोन पोल पाडून नुकसान केले. सुरक्षारक्षकालाही धमकावले.
त्यानंतर वसीम शेख हे कंपनीचे अधिकारी सुनील तिवारी, रमेशकुमार सहा व पोलिसांना घेऊन झालेल्या नुकसानीची माहिती देत असताना त्या ठिकाणी पुन्हा युवराज राजेभोसले व इतर सात ते आठ जणांनी येऊन सुनील तिवारी व रमेशकुमार सहा यांना काठ्या, लोखंडी रॉड, टिकावाचा फायबर दांडा, लोखंडी साखळी यांनी मारहाण केली.
तसेच वसीम शेख व सुनीलकुमार तिवारीचा मोबाइल फोन, मोटारीची किल्ली व रोख २५ हजार रुपये काढून घेतल्याची फिर्याद वसीम शेख यांनी पोलिसांकडे दिली आहे. या संदर्भात गुन्हा दाखल करण्यात आला असून, शंकरराव ऊर्फ शहाजी भाऊसाहेब राजेभोसले (४५) यास अटक करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.