सांगली : राज्यात सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न काही शक्ती करीत असल्याचा दावा राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी गुरुवारी माध्यमांशी बोलताना केला.

जिल्हाधिकारी कार्यालयात स्वातंत्र्यदिनानिमित्त ध्वजारोहण समारंभ झाल्यानंतर मंत्री पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांना शक्तिपीठ महामार्ग रद्द करण्यात यावा या मागणीसाठी सुरू असलेल्या आंदोलनाबाबत विचारणा केली असता ते म्हणाले, सध्या राज्यात काही झालं की सरकार, राज्य अस्थिर करण्याचा प्रयत्न सुरू होतो. एक प्रकारे राज्यात अराजकता पसरवण्याचे काम काही लोक प्रयत्न करीत असल्याचे वाटते. त्यामुळे राज्यामध्ये सतत अराजकता निर्माण व्हावी यासाठी काही शक्ती काम करत आहेत की काय, अशी शंकास्पद स्थिती निर्माण होत आहे.

शक्तिपीठ महामार्गाला जो विरोध होतोय तो वाढत चालला आहे, याबाबत विचारलेल्या प्रश्नावर मंत्री पाटील म्हणाले, राज्यात कोयना धरण झालं नसतं तर आज महाराष्ट्राची वीजनिर्मिती आणि शेतीला पाणी मिळालं नसतं. कोयना धरण निर्मितीसाठी काहींच्या जमिनी संपादित करण्यात आल्या. दुर्दैवाने गेली सहा-सात दशकांपासून विस्थापित झालेल्यांचे पुनर्वसन योग्य पध्दतीने झालेले नाही. त्यांना नुकसान भरपाई योग्य मिळालेली नाही.

समृद्धी महामार्ग झाला नसता तर नागपूरहून मुंबईला आठ तासात शेतकऱ्यांचा शेतीमाल पोहोचला असता का? असा सवाल शक्तिपीठ महामार्गाला विरोध करणाऱ्यांसाठी उपस्थित केला. तसेच शक्तिपीठ महामार्ग विविध ठिकाणच्या तीर्थक्षेत्रांना जोडणारा महामार्ग आहे. हा महामार्ग होत असताना बाधित शेतकऱ्यांना भरपाई योग्य मिळाली पाहिजे. त्यांचं पुनर्वसन योग्य झालं पाहिजे. त्यामुळे शेतकऱ्यांनी शक्तिपीठला विरोध बंद करावा आणि आपल्याला भरपाई कशी चांगली भेटेल याबाबत विचार करावा, असे आवाहन शक्तिपीठ महामार्ग बाधित शेतकऱ्यांना त्यांनी केले.

दरम्यान, बुधगाव येथे झालेल्या एका कार्यक्रमाच्या व्यासपीठावर मंत्री पाटील यांच्यासमवेत आजी-माजी खासदारांसह तीन पाटील एकत्र हास्यविनोदात दंग असल्याचे दिसून आले. लोकसभेला एकमेकांविरोधात मैदानात उतरलेले माजी खासदार संजय काका पाटील, खासदार विशाल पाटील आणि नुकतेच काँग्रेस सोडून भाजपवासी झालेले पृथ्वीराज पाटील एका कार्यक्रमात गप्पागोष्टीत रंगल्याचे दिसून आले.

बुधगाव (ता. मिरज) येथील सुपुत्र लेप्टनंट कर्नल प्रकाश पाटील यांच्या स्मरणार्थ बुधगाव ग्रामपंचायतीच्यावतीने लोकवर्गणीतून स्वागत कमान उभारण्यात आली आहे. लेप्टनंट कर्नल पाटील यांना १९९८ आसाममध्ये बोडो अतिरेक्याविरुध्द सुरू असलेल्या कारवाईमध्ये वीरमरण प्राप्त झाले होते. त्यांच्या स्मरणार्थ उभारण्यात आलेल्या स्वागत कमानीचे लोकार्पण मंत्री पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी खासदार पाटील, माजी खासदार संजयकाका पाटील व पृथ्वीराज पाटील हे व्यासपीठावर एकत्र आले होते. यावेळी तिघांमध्ये गप्पागोष्टी होत असतानाच हास्यविनोद सुरू होता. याची चर्चा सांगलीच्या राजकीय वर्तुळात सुरू होती.