औरंगजेबाचे फोटो व्हॉट्सअॅप स्टेटसला लावल्याप्रकरणी कोल्हापुरात जमाव प्रक्षुब्ध झाला आहे. लोकांनी रस्त्यावर येऊन आंदोलन पुकारले आहे. याप्रश्नी कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. छत्रपती संभाजी महाराजांचा अतोनात छळ करणाऱ्या औरंगजेबाचं उदात्तीकरण झाल्याने कोल्हापुरातील जनतेने संताप व्यक्त केला आहे. यावरून छत्रपती घराण्याचे वंशंज राज्यसभेचे माजी खासदार छत्रपती संभाजीराजे यांनीही याप्रकरणी आवाज उठवला आहे.
हेही वाचा >> “…म्हणून कोल्हापुरात जमाव प्रक्षुब्ध झाला”, शंभूराज देसाईंनी स्पष्टच सांगितलं; म्हणाले, “गाड्यांची मोडतोड झाल्याने…”




“शिवशाहूंच्या कोल्हापूर नगरीमध्ये औरंगजेबाचे उदात्तीकरण करणाऱ्या धर्मांध प्रवृत्तींना वेळीच चाप लावला पाहिजे. सरकारने दोषींवर कडक चार्जशीट दाखल करून इतकी कठोर कारवाई करावी, की परत औरंग्याचे उदात्तीकरण करण्याचे व सामाजिक सलोखा बिघडविण्याचे धाडस या राज्यात कुणाचे झाले नाही पाहिजे”, असं छत्रपती संभाजीराजे म्हणाले आहेत.
कोल्हापुरात नेमकं काय घडलं?
कोल्हापूर शहरातील काही तरुणांनी मोबाईलवर आक्षेपार्ह स्टेटस ठेवले होते. औरंगजेबाचे उदात्तीकरण करणारा मजकूर त्यावर होता. ही माहिती समजल्यानंतर हिंदुत्ववादी संघटनांच्या कार्यकर्त्यांनी पोलीस स्टेशन समोर आंदोलन केले. त्यानंतर शहरात काही ठिकाणी दगडफेक झाली. शहरात प्रचंड तणाव निर्माण झाला. परिस्थिती लक्षात घेऊन जमावबंदी आदेश लागू करण्यात आला आहे.