सांगली : मराठवाड्यात झालेल्या अतिवृष्टी व पुराने मोडलेले संसार पुन्हा उभे करण्यासाठी चितळे डेअरीकडून मुख्यमंत्री सहायता निधीसाठी एक कोटीची मदत दिली. चितळे डेअरीच्या वतीने भागीदार श्रीपाद चितळे, विश्वास चितळे व व्यवस्थापकीय भागीदार निखिल चितळे यांनी मदतीचा धनादेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सुपूर्द केला.

मराठवाड्यातील सोलापूर, लातूर, बीड, धाराशिव जिल्ह्यांत अतिवृष्टी व नद्यांना आलेल्या पुरामुळे शेती व शेतकर्‍यांचे मोठे नुकसान झाले आहे. अनेक संसार उघड्यावर पडले आहेत. अशा पूरग्रस्तांना मदतीचा हात देऊन पुन्हा उभे करण्यासाठी चितळे डेअरीने एक सामाजिक जबाबदारी म्हणून आपला वाटा उचलला आहे. चितळे डेअरी उद्योगाच्या वतीने एक कोटी रुपयांची मदत जाहीर करत मदतीचा धनादेश मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे सुपूर्द केला.

चितळे डेअरी गेल्या ८६ वर्षांपासून दुग्ध व्यवसायासोबतच समाजकार्यातही सातत्याने अग्रस्थानी राहिली आहे. करोनासारख्या जागतिक महामारीच्या प्रसंगीही चितळे डेअरी मदतीसाठी पुढे आली होती. तसेच सांगली जिल्ह्यातील कृष्णाकाठचा भिलवडी परिसर, तर चितळे डेअरीचा स्थानिक भाग, या भागात पूरस्थिती निर्माण झाल्यानंतर चितळे डेअरीने स्थानिक नागरिकांना मदतीचा हात दिला होता. शेतकरी हा आपल्या देशाचा कणा आहे. या वर्षी राज्याच्या काही भागांत झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकर्‍यांच्या कल्याणासाठी आणि पुनर्बांधणीसाठी हातभार लावणे ही आमची जबाबदारी आहे, असे चितळे डेअरीचे व्यवस्थापकीय भागीदार निखिल चितळे यांनी सांगितले.

भिलवडी परिसरात चितळे डेअरी शेतकर्‍यांना कृषी पूरक दूध व्यवसाय करण्यासाठी कायम प्रोत्साहित करत आहे. म्हैस खरेदीसाठी मदत करण्याबरोबरच उत्पादित दूधही खरेदी केले जाते. याचबरोबर पशूपालनात अत्याधुनिक ज्ञान पशूपालकांना देण्याबरोबरच त्यांच्या अडचणीच्या काळात मदतीचा हातही दिला जातो. यापुर्वी कृष्णा नदीला आलेल्या महापूरावेळी अनेक जनावरांचा बळी गेला. अशांना मदती करण्यासाठी चितळे डेअरीने हात पुढे करून पुन्हा त्यांना उभे करण्याचे काम चितळे डेअरीने केले आहे.

एक सामाजिक जबाबदारी म्हणून चितळे डेअरी कायम पुढे असते. त्याचाच एक भाग म्हणून मराठवाड्यातील पूरग्रस्तांसाठी चितळे डेअरीने ही मदत केली असल्याचे श्री. चितळे यांनी सांगितले. शेतकरी नैसर्गिक संकटामुळे कधी खचून जात नाही. त्याला अल्प मदत दिली तर तो नव्या जोमाने पुन्हा उभा राहतो हा कृष्णाकाठचा अनुभव असल्याचेही ते म्हणाले.