“अनिल देशमुखांचं जे झालं तेच अजित पवार आणि अनिल परबांचं होईल” – चंद्रकांत पाटील

चंद्रकांत पाटलांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना पत्र लिहून अजित पवार आणि अनिल परब यांच्या सीबीआय चौकशीची मागणी केली आहे.

चंद्रकांत पाटील यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना पत्र लिहित अजित पवार आणि अनिल परबांच्या सीबीआय चौकशीची मागणी केली आहे.

हे फक्त पत्र आहे. पुढची सगळी प्रक्रिया आम्ही करणार आहोत. अनिल देशमुखांचं जे झालं तेच अजित पवार आणि अनिल परबांचं होईल. त्यामुळे जास्त जोरात बोलू नका असा इशारा भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिला आहे. त्यांनी आज केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना पत्र लिहून अजित पवार आणि अनिल परब यांच्या सीबीआय चौकशीची मागणी केली आहे.

माध्यमांशी बोलताना त्यांनी या पत्रातल्या मागण्या आणि पत्राचा उद्देश स्पष्ट केला आहे. बेकायदेशीरपणे पैसे वसुली हाच राज्य सरकारचा कारभार असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. महाराष्ट्राच्या जनतेचा कायद्यावरचा विश्वास उडत चालला आहे, ह्याची दखल केंद्रीय गृहमंत्र्यांनी घ्यावी असंही पाटील म्हटले.


चंद्रकांत पाटील यांनी सचिन वाझे प्रकरणातल्या अनेक गोष्टी या पत्राच्या माध्यमातून गृहमंत्र्यांसमोर मांडल्या आहेत. सचिन वाझे याला २००४ सालीच निलंबित करण्यात आलं होतं. मात्र, २०२० मध्ये सध्याच्या महाविकास आघाडी सरकारने त्याला पुन्हा पोलीस दलात रुजू करुन घेतलं असा आरोपही त्यांनी केला आहे. त्याचबरोबर वाझे याने चौकशीदरम्यान राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दर्शन घोडावत यांच्या माध्यमातून त्याला बेकायदेशीर गुटखा विक्रेत्यांकडून तसंच उत्पादकांकडून १०० कोटी वसूल करण्यास सांगितलं असंही त्यांनी या पत्रात म्हटलं आहे.

हेही वाचा- अजित पवारांची सीबीआय चौकशी करा; चंद्रकांत पाटलांचं केंद्रीय गृहमंत्र्यांना पत्र

परिवहन मंत्री अनिल परब यांनी मुंबई महापालिकेच्या कंत्राटदारांकडून दोन कोटी रुपये वसूल करण्यास सांगितल्याचं वाझे याने चौकशीत उघड केलं आहे, असंही या पत्रात लिहिलेलं आहे. सचिन वाझेने दिलेल्या कबुलीजबाबात त्याने अजित पवार आणि अनिल परब यांनी आपल्याला वसुली करण्यास सांगितलं अशी माहिती दिली आहे. त्यामुळे या दोघांचीही सीबीआय चौकशी करण्यात यावी, अशी मागणी चंद्रकांत पाटील यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे केली आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Chnadrakant patil warns ajit pawar and anil parab wrote a letter to amit shah about their cbi enquiry vsk