परभणी: काँग्रेस पक्षाच्या सद्भावना पदयात्रेच्या दुसऱ्या दिवशीही राज्यभरातील महत्त्वाच्या काँग्रेस नेत्यांनी भारतीय जनता पक्षावर जोरदार हल्ला चढवत भारतीय जनता पक्ष देशात व राज्यात जातीय आणि धर्मांधतेचे विष कालवत असल्याची टीका केली. जात जनगणनेच्या मुद्द्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना माघार घ्यावी लागली आणि राहुल गांधी यांच्या मताप्रमाणे निर्णय घ्यावा लागला असेही यावेळी बहुतांश वक्त्यांनी नमूद केले.

महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्नीथला यांच्या प्रमुख उपस्थितीत व प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या नेतृत्वाखाली आज सोमवारी (दि.५) शहर काँग्रेस कार्यालयापासून संविधान बचाओ पदयात्रा काढण्यात आली. या यात्रेची सांगता अक्षता मंगल कार्यालयात संविधान संमेलनाने झाली. विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे नेते विजय वडेट्टीवार, गोव्याचे प्रभारी माणिकराव ठाकरे, काँग्रेस प्रदेश कार्याध्यक्ष नसीम खान, खा. चंद्रकांत हंडोरे, खा. प्रणिती शिंदे, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव कुणाल चौधरी, यु. बी. व्यंकटेश, खा. डॉ. कल्याण काळे, खा. रविंद्र चव्हाण, प्रदेश उपाध्यक्ष व यात्रेचे समन्वयक मोहन जोशी, परभणी जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष सुरेश वरपुडकर, शहराध्यक्ष नदीम इमानदार, बाळासाहेब देशमुख, युवक अध्यक्ष अमोल जाधव, सुहास पंडित आदी काँग्रेस नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी चेन्नीथला म्हणाले की, सोमनाथ सुर्यवंशी व विजय वाकोडे यांच्यावर झालेल्या अन्यायाप्रश्नी राहुल गांधी यांनी आवाज उठवला, या घटनेला तीन महिने झाले तरी तरी अद्याप सुर्यवंशी यांच्या मारेकऱ्यांवर सरकारने कोणतीच कारवाई केलेली नाही, मुख्यमंत्री यावर काही बोलत नाहीत. राहुल गांधी यांनी सामाजिक न्यायासाठी जातीजनगणनेचा मुद्दा उपस्थित केला, याचा फायदा मागास, वंचित, पीडित लोकांना होईल.जातनिहाय जनगणनेचा निर्णय घेतला पण तो कधी होईल हे जाहीर करत नाहीत असेही ते म्हणाले.

यावेळी प्रदेशाध्यक्ष सपकाळ यांनी जातनिहाय जनगणना झाली तर मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागेल. ओबीसीला २७ टक्के आरक्षण आहे ते सुद्धा वाढू शकते. भाजप मात्र जाती जातीत भांडणे लावत आहे अशावेळी बहुजन समाज एकत्र असणे ही काळाची गरज आहे. राज्यात रोज ६ शेतकरी आत्महत्या होत आहेत, सरकारला मात्र शेतकऱ्यांचे प्रश्न सोडून अदानी अंबानींचे हित महत्वाचे वाटत आहे. गरज नसताना ८८ हजार कोटींचा शक्तीपीठ महामार्ग निर्माण करण्यात सरकार प्राधान्य देत आहे असा आरोपही यावेळी सपकाळ यांनी केला. विधिमंडळ पक्षनेते विजय वडेट्टीवार यावेळी म्हणाले की, भाजप २०१४ पासून देशात व राज्यात जातीयतेचे व धर्मांधतेचे विष पेरत आहे. भाजपला दुसऱ्याची घरे फोडण्याची सवय लागली आहे. आमची वेळ आल्यावर याचा बदला घेऊ. काही लोक पक्ष सोडून जात आहेत पण दुसऱ्याच्या मागे चालण्यापेक्षा स्वतःचा रस्ता स्वतः तयार करा, असे वडेट्टीवार म्हणाले.

माजी मंत्री नसीम खान यांनी देशावर संकट येते, सामाजिक सौहार्द बिघडते तेव्हा सर्वात आधी काँग्रेस पक्ष समोर येतो. सरपंच संतोष देशमुख यांची हत्या करण्यात आली, पोलीस कोठडीत सोमनाथ सुर्यवंशी यांची हत्या करण्यात आली पण भाजपा युती सरकारवर त्याचा काही फरक पडला नाही. आज देशात संविधान व लोकशाही वाचवण्याचे काम काँग्रेस पक्ष करत आहे असे प्रतिपादन केले. खासदार चंद्रकांत हांडोरे यांनी भाजपला संविधान बदलायचे आहे आणि मनुवाद आणायचा आहे असा आरोप केला.

खासदार प्रणिती शिंदे म्हणाल्या की,पहलगामला अतिरेकी हल्ला झाला तेव्हा राहुल गांधी तिथे गेले, हल्ल्यातील मृतांच्या नातेवाईकांची भेट घेतली पण पंतप्रधान मोदी मात्र बिहारला प्रचार सभेला गेले.भाजपने पक्ष फोडल्यामुळे काँग्रेस कमकुवत होणार नाही उलट महायुतीतच तिन तिघाडा व काम बिघाडा अशी गत झाली आहे. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष, माजी आमदार मोहन जोशी यांनी केले तर आभार शहराध्यक्ष नदीम इनामदार यांनी मानले.