दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे भव्य स्मारक उभारण्यास सोलापूर महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत एकमताने मान्यता देण्यात आली. त्यासाठी प्रतिकात्मक स्वरूपात २५ लाखांचा निधी राखून ठेवण्यात येणार आहे. मुंबईतील शिवसेना भवनाच्या धर्तीवर सोलापुरात हे स्मारक उभारले जाणार आहे.
लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर शहरातील विजापूर रस्त्यावर रेवणसिध्द मंदिराजवळ महानगरपालिकेच्या मालकीच्या सुमारे चार हजार चौरस मीटर भूखंडावर बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक उभारण्याचा निर्णय घेण्यात आल्याने शिवसैनिकांना ‘आपलेसे’ करण्यात पालिकेतील सत्ताधारी काँग्रेस आघाडी यशस्वी झाल्याचे मानले जात आहे. पालिका सभेत सभागृहनेते महेश कोठे यांच्यासह विरोधी पक्षनेते कृष्णाहरी दुस्सा, राष्ट्रवादीचे गटनेते दिलीप कोल्हे, शिवसेनेचे गटनेते भीमाशंकर म्हेत्रे, भाजपचे जगदीश पाटील, सुरेश पाटील, शिवसेनेचे मनोज शेजवाल आदींनी याबाबतचा प्रस्ताव मांडला होता. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे एक बहुआयामी व्यक्तिमत्त्व होते. कला, क्रीडा, संगीत, साहित्य, समाजकारण आणि राजकारण या क्षेत्रांशी त्यांचे अतूट नाते होते. आपल्या कुंचल्यांनी भल्याभल्यांची भंबेरी उडविणारे, आपल्या दमदार नेतृत्वाने कणखर व प्रखर भूमिकेने गेली चार दशके मराठी माणसाच्या मनावर अधिराज्य करून मराठी अस्मितेची जपणूक करण्याची भूमिका बाळासाहेबांनी शेवटपर्यंत पार पाडली. मराठी माणसाचा विकास, महाराष्ट्राचा सर्वागीण विकास करण्यासाठी त्यांनी आयुष्यभर संघर्ष केला आणि मराठी मनाचा आवाज बुलंद केला. अशा प्रेरणादायी नेतृत्वाचे स्मरण कायम स्वरूपी राहावे म्हणून शहरात मुंबईतील शिवसेना भवनाच्या धर्तीवर भव्य स्मारक असावे, असे प्रस्तावात म्हटले आहे. वाचनालय, ग्रंथालय, अभ्यासिका, अॅम्फी थिएटर, कलादालन अशा विविध घटकांनी युक्त असे भव्य स्मारक उभारताना जागा संपादनाची अडचण सोडविण्यासाठी आयुक्तांनी कार्यवाही करावी, असे ठरावात नमूद करण्यात आले आहे.
ठाकरे याच्या स्मारक उभारणीची घोषणा दीड वर्षांपूर्वी झाली होती. त्याबाबतचा ठरावही पालिका सभेत मंजूर झाला होता. परंतु आता लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर ठाकरे यांच्या स्मारकाचा विषय पुन्हा सभागृहात येऊन तो झटपट मंजूरही झाला. त्यामुळे स्थानिक शिवसैनिकांत समाधानाचे वातावरण दिसून येते. मात्र या मुद्दय़ावर लोकसभा निवडणुकीत बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारक उभारण्यावरून श्रेयवादाचे राजकारण होण्याची शक्यता वर्तविली जात असून यात सामान्य शिवसैनिकांना ‘आपलेसे’ करून घेण्यात काँग्रेसची मंडळी यशस्वी होतील, असा कयास व्यक्त होत आहे.
संग्रहित लेख, दिनांक 2nd Mar 2014 रोजी प्रकाशित
बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक सोलापुरात उभारण्याचा निर्णय
दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे भव्य स्मारक उभारण्यास सोलापूर महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत एकमताने मान्यता देण्यात आली. त्यासाठी प्रतिकात्मक स्वरूपात २५ लाखांचा निधी राखून ठेवण्यात येणार आहे.
First published on: 02-03-2014 at 02:45 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Decison of built up balasaheb thakare memorial in solapur