मनसेच्या गुढी पाडवा मेळाव्यापासून राज्यात मशिदींवरील भोंग्यांचा मुद्दा चर्चेत आला आहे. राज ठाकरेंनी हे भोंगे बंद करण्याची मागणी केली आहे. तसेच, मशिदींवरील हे भोंगे बंद न केल्यास त्यांच्यासमोरच लाऊडस्पीकर लावून हनुमान चालिसा वाजवण्याची भूमिका देखील राज ठाकरेंनी घेतली आहे. एकीकडे त्यांच्याच पक्षाचे पुण्यातील नगरसेवक वसंत मोरे यांनी याविरोधात भूमिका घेतलेली असताना दुसरीकडे राज्यातील सत्ताधाऱ्यांकडून देखील राज ठाकरेंवर निशाणा साधण्यात येत आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बीडमध्ये एका जाहीर सभेत बोलताना राज ठाकरेंच्या भूमिकेवर अप्रत्यक्षपणे निशाणा साधला आहे.
“राज्यातलं वातावरण गढूळ करण्याचं काम”
मशिदींवरील भोंग्यांवरून अजित पवारांनी अप्रत्यक्षपणे टीका केली आहे. “सध्याचं राज्यातलं वातावरण गढूळ करण्याचं काम सुरू आहे. आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. वर्षानुवर्ष आपण गुण्या गोविंदाने नांदतोय. रामनवमी, हनुमान जयंती, आंबेडकर जयंती, रमजान, गुढीपाडवा असे सगळे सण एकमेकांना शुभेच्छा देऊन आपण साजरे करतोय. पण काय कारण आहे हो? भोंगे बंद करा, अमकं करा.. मग इतक्या आधीपासून तुम्ही काय केलं? तेव्हा कळलं नाही का? आज राज्य करोनाच्या संकटानंतर रुळावर आणण्याचा प्रयत्न आम्ही करतोय”, असं अजित पवार म्हणाले.
दोन दिवसांपूर्वीच अजित पवारांनी राज ठाकरेंच्या विधानाचा अशाच प्रकारे शिर्डीत बोलताना समाचार घेतला होता. “अरे भाषण करणं सोपं आहे रे बाबा. पण आता त्यांच्याच पक्षाचे नगरसेवक आम्हाला निवडून यायचं आहे आणि हे काय सांगताय सांगू लागले आहेत. कोणाला तरी बरं वाटण्यासाठी, निवडणुकीवर डोळा ठेवून अशा प्रकारची भाषणं, वक्तव्यं करायची हे आपल्या शाहू, फुले, आंबेडकरांच्या महाराष्ट्राला परडवणारं नाही,” असं ते म्हणाले होते. “काही लोक समाजात संभ्रमावस्था निर्माण करण्याचं काम करतात. कित्येत वर्ष लोक गुण्यागोविंदाने वर्षानुवर्षे एकमेकांना साथ देत आहेत, जातीय सलोखा ठेवला आहे, जातींमध्ये, धर्मात तेढ निर्माण होऊ देत नाही. पण काही पक्षाचे नेते इथं असं करा, इथं हा भोंगा लावा, तिथं हा भोंगा लावा सांगत आहेत”, असं देखील अजित पवारांनी नमूद केलं होतं.
मनसेच्या गुढी पाडवा मेळाव्यात राज ठाकरेंनी मशिदींवरील भोंगे काढण्याची मागणी केली. तसं न झाल्यास त्यासमोर लाऊडस्पीकरवर हनुमान चालीसा वाजवण्याची देखील भूमिका त्यांनी जाहीर केली. यावरून सध्या वाद सुरू झालेला असतानाच त्यांच्याच पक्षाचे पुण्याचे नगरसेवक वसंत मोरे यांनी या भूमिकेच्या उलट भूमिका घेतली आणि मशिदींवरील भोंग्यांचा वाद मनसेच्या पक्षांतर्गत वादाच्या दिशेने वळला. वसंत मोरे यांचं पुणे शहर अध्यक्षपद पक्षानं काढून घेतलं आहे. भोंग्यांच्या याच वादावर बोलताना अजिच पवारांनी राज ठाकरेंवर टीकास्त्र सोडलं आहे.
करोनावरून अजित पवारांच्या कानपिचक्या…
दरम्यान, यावेळी बोलताना अजित पवार यांनी करोनावरून देखील उपस्थितांना कानपिचक्या दिल्या. “निर्बंध उठवले असले, तरी सगळ्यांनी काळजी घ्या. उगीच आता गेला गेला गेला करू नका. कालपरवाच मुंबईत करोनाचे नवे प्रकार सापडले”, असं अजित पवार म्हणाले.
“तू मला नंतर सल्ला द्यायला ये…”
दरम्यान, यावेळी उपस्थितांपैकी कुणीतरी अजित पवारांना करोनाच्या निर्बंधांविषयी काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करू लागला. तेव्हा अजित पवारांनी त्याला त्यांच्या शैलीत टोलवल्यानंतर उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला. “तू मला नंतर सल्ला द्यायला ये.. तुझं ऐकतो मी. जरा माझं भाषण होऊ दे. आपली काही माणसं सल्ला द्यायला लै भारी असतात. फक्त तो अजून चंद्रावर गेला नाहीये. नाहीतर माझं काही ऐकायचाच नाही”, असं अजित पवार यावेळी म्हणाले.