Devendra Fadnavis : राज्याची विधानसभेची निवडणूक तोंडावर आल्यामुळे सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांनी कंबर कसली आहे. अनेक नेत्यांचे राज्यात दौरे सुरु असून मतदारसंघाचा आढावा घेतला जात आहे. महाविकास आघाडी आणि महायुतीमधील पक्षात विधानसभेच्या जागावाटपाबाबत खलबतं सुरु आहेत. मात्र, असं असतानाच गेल्या काही दिवसांपासून महायुतीमध्ये धुसफूस सुरु असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. काही दिवसांपूर्वी शिवसेनेचे नेते रामदास कदम यांनी मंत्री रवींद्र चव्हाण यांच्यावर टीका केली होती. त्यानंतर शिवसेनेचे नेते तानाजी सावंत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्यांबरोबर बसल्यानंतर बाहेर आल्यावर उलट्या होतात, असं वक्तव्य केलं होतं. काही दिवसांपूर्वी भाजपाच्या एका नेत्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला महायुतीत घेतल्यामुळे आमच्या कार्यकर्त्यांचं वाटोळं झाल्याचं म्हटलं होतं. अशा प्रकारच्या विधानामुळे महायुतीमधील धुसफूस चव्हाट्यावर आली होती. या घडामोडींबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी भाष्य करत महायुतीने एक निर्णय घेतल्याचं त्यांनी सांगितलं. "आता महायुतीमधील तीनही पक्ष तीन प्रवक्त्यांची घोषणा लवकरच करणार आहे", असं देवेंद्र फडणवीस यांनी टीव्ही ९ मराठी या वृत्तवाहिनीच्या मुलाखतीमध्ये बोलताना म्हटलं आहे. हेही वाचा : Devendra Fadnavis on CM face: “शरद पवारांच्या डोक्यात मुख्यमंत्रीपदाचा चेहरा फिक्स, त्यात उद्धव ठाकरे…”, देवेंद्र फडणवीस यांचं मोठं विधान देवेंद्र फडणवीस काय म्हणाले? उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लाडकी बहीण या योजनेबाबत केलेल्या एका जाहिरातीसंदर्भात एक प्रश्न विचारण्यात आला. यावर बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, "माझं मत असं आहे की, जाहीरात बंद करण्याची आवश्यकता नाही. शेवटी तीन वेगवेगळे पक्ष आहेत. पक्षांनी त्यांचं ब्रँडिंग केलं पाहिजे. आता आपण जर एखादी ब्रँडिंग करतो, त्यावेळी सारख्या गोष्टी रजिस्टर होतात. मात्र, तेच जर वेगवेगळ्या गोष्टी लोकांसमोर गेल्या तर त्यामध्ये कमी प्रमाणात रजिस्टर होतात", असं देवेंद्र फडणवीसांनी म्हटलं आहे. महायुतीमधील तीनही पक्षांच्या नेत्यांच्या विधानासंदर्भात बोलताना फडणवीस म्हणाले, "आता अशा प्रकारे विधाने करणे चुकीचे आहे. अशा प्रकारचे विधाने करून आपण आपल्या पक्षालाही खड्यात घालण्याचं काम करतो आणि महायुतीलाही कमजोर करतो. त्यामुळे आम्ही आता निर्णय घेतला आहे की, लवकरच तीन पक्षांचे तीन अधिकृत प्रवक्ते निवडणार आहोत. यानंतर जे निवडलेले प्रवक्ते आहेत. ते जे बोलतील तेच अधिकृत असेल. या व्यतिरिक्त काहीही अधिकृत असणार नाही", असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. पवारांच्या मनातील मुख्यमंत्रिपदाचा चेहरा सागणं कठीण महाविकास आघाडी आणि महायुतीमधील मुख्यमंत्रिपदाच्या दावेदारीबाबत देवेंद्र फडणवीस यांना प्रश्न विचारण्यात आला होता. यावर बोलताना देवेंद्र फडणवीसांनी महाविकास आघाडीमध्ये मुख्यमंत्रिपदाचा चेहरा घोषित करण्यावरून चाललेल्या वादावर खोचक टीका केली. ते म्हणाले, "शरद पवारांच्या डोक्यात कोण नाही, हे मला सांगता येईल. पण त्यांचा डोक्यात कुणाचा चेहरा आहे, हे सांगणे सर्वात कठीण आहे", अशीही कबुली देवेंद्र फडणवीस यांनी दिली.