स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या राज्यात विविध ठिकाणी जोरदार प्रचारसभा सुरू आहेत. नेतेमंडळींकडून विरोधी पक्षांवर तसेच विरोधी पक्षांच्या नेत्यांवर जोरदार टीका, टिप्पणी सुरू असल्याचे दिसत आहे. बीड जिल्ह्यात देखील भाजपा विरुद्ध राष्ट्रवादी असे वातावरण निर्माण झालेले आहे. भाजपा नेत्या पंकजा मुंडे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री धनंजय मुंडे यांच्या प्रचारसभा सुरू असून, यामध्ये जोरदार आरोप-प्रत्यारोप होताना दिसत आहे. पंकजा मुंडे यांनी धनंजय मुंडेंवर केलेल्या टीकेला आता धनंजय मुंडे यांनी देखील प्रत्युत्तर दिले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे हे बीड येथील आष्टी येथे एका प्रचार सभेत बोलताना म्हणाले, “आमची औकात काढणाऱ्यांना परळीच्या जनतेने दाखवलं आहे. इथे आमची औकात काढणाऱ्यांना आष्टीच्या जनतेने दाखवलं आहे.”

तसेच, “एखाद्या गावात जर पालकमंत्री आणि मंत्रीमंडळातील मंत्री म्हणून मी ५० कोटी किंवा १०० कोटींची घोषणा करत असेल, आणि आम्ही जर आमच्या शब्दाला जागं राहत असू, तर तुम्ही आमच्यावर टीका करणार त्यांची औकात आहे का द्यायची. तुम्ही तर पाच वर्षे राज्याच्या सत्तेत होता. केंद्राच्या सत्तेत होता, इथला आमदार भाजपाचा होता, तुम्ही जिलह्याच्या पालकमंत्री होत्या, एक नाही तर दोन आमदार झाले. तरी देखील तुमची औकात विकासाला पैसे द्यायची का दाखवता आली नाही? राहिला माझा औकातीचा प्रश्न २०१९ च्या निवडणुकीत महिला बालकल्याणमंत्री, ग्रामविकासमंत्री, जलसंधारणमंत्री या तीन चार मंत्र्यांचा एकदाच ३२ हजार मतांनी पराभव केला ना, ही आमची औकात आहे.” असंही धनंजय मुंडे यांनी बोलून दाखवलं.

याचबरोबर, “काल अमित शहा पुण्यात आले. नरेंद्र मोदी नंतर सगळ्यात मोठे भाजपाचे नेते पुण्यात. मी हिशोब लावत होतो की गल्लीपासून दिल्लीपर्यंत भाजपा सगळीकडे आहे. मी काल रात्री केजला सभेसाठी गेलो, केजमध्ये कुठेही मला एक साधं कमळाचं चिन्ह देखील दिसलं नाही. हा जिल्हा, केज मतदारसंघ भाजपाचा जिल्ह्याचा खासदार भाजपाचा, एक विधानपरिषदेचा आमदार भाजपाचा वारसा चालवणाऱ्या आमच्या ताईसाहेब भाजपाच्या राष्ट्रीय चिटणीस आणि केजमध्ये कमळच नाही. कुठे आहे भाजपा? इथे सुद्धा लाज वाटली पाहिजे, अरे एक काळ भाजपाचा आम्ही असा पाहिला, त्या काळात एक जरी मत मिळालं तरी कमळाचं चिन्ह द्यायचे, कारण चिन्हावर मत मिळावं म्हणून. एक मत मिळालं तरी. आता भाजपावर या बीड जिल्ह्यात अशी वेळ आली, की कमळावर मत मिळत नाही. म्हणून कमळच काढून घ्यायचं आणि दुसरं काहीतरी उभं करायचं. इथे देखील तसंच केलंय, तीन वॉर्डात कमळ नाही. अरे लाज वाटली पाहिजे. तुम्ही जर गल्लीपासून दिल्लीपर्यंत सगळ्या सत्ता भोगता आणि देशात शतप्रतिशत भाजपा आहे, तर मग आष्टीच्या तीन ठिकाणी कमळ का नाही? कारण तुम्हाला माहिती आहे त्या कमळावर तिथे मत मिळत नाही. हे राजकारण तुम्ही(जनतेने) लक्षात घ्या. आज भाजपा या जिल्हयात लयास आली आहे.” असं देखील धनंजय मुंडे यावेळी म्हणाले.

‘दादा ३२व्या नंबरचे मंत्री’ म्हणत पंकजा मुंडेंचा टोला; तर, ‘जनतेनं औकात दाखवली ते विसरलात का?,’ धनंजय मुंडेंचं प्रत्युत्तर

तर, “या नगरपंचायतीच्या निवडणुकीत दिवाबत्ती, घरकुल, स्वच्छ पाणी, चांगले रस्ते, स्वच्छता, ड्रेनेज काढणं आणि करणं हे सगळं आमचं कर्तव्य आहे. कुणी जर म्हणत असेल, की आम्ही अशा पद्धतीने विकास केला. तो विकास नाही ते तुमचं कर्तव्य आहे. मी जर परळीत रस्ते, ड्रेनेज, सभागृह, स्वच्छता हे केलं असेल तर ते माझं कर्तव्य आहे, तो विकास नाही.” असं म्हणत धनंजय मुंडे यांनी पंकजा मुंडे यांच्यावर निशाणा साधला.

काय म्हणाल्या पंकजा मुंडे?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

बीड जिल्ह्यातील वडवणी नगरपंचायत निवडणुकीच्या प्रचारसभेत बोलताना पंकजा मुंडेंनी धनंजय मुंडेंवर परखड टीका केली होती. “तुमच्या ताई जेव्हा निवडून आल्या, मंत्री झाल्या. तेव्हा त्या पहिल्या चार मंत्र्यांमध्ये होत्या. असं ३२ व्या नंबरवर मी कधीच गेले नाही,” असं त्या म्हणाल्या.  याशिवाय जिल्ह्यासाठी मिळवलेल्या निधीवरूनही पंकजांनी निशाणा साधला. “निवडणुकीत निवडून आल्यानंतर जिल्ह्याच्या विकासासाठी १०० कोटी रुपयांचा निधी देऊ, असं आश्वासन राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी दिलं होतं. एक नव्हे तर पाटोदा, शिरूर, आष्टी, केज आणि वडवणी अशा पाचही ठिकाणी त्यांनी ही घोषणा केली होती. एका झटक्यात ५०० कोटी रुपये द्यायला तयार होतात, पण दोन वर्ष उलटूनही निधी मिळाला नाही. मग दोन वर्षे काय टाळं पिटत होते का? असा सवाल करत ते पैसे द्यायची यांची ताकदच नाही,” असा टोला पंकजांनी लगावला होता.