अलिबाग – दिवाळीची सुट्टी साजरी करण्यासाठी बाहेर पडलेल्या मुंबईकरांमुळे शनिवारी दिवसभर द्रुतगती मार्ग वाहतूक कोलमडली होती. पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांची संख्या वाढल्याने ठिकठिकाणी वाहतूक कोंडी झाली आहे.

दिवाळी आणि सलग सुट्ट्यांमुळे मुंबई मौजमजा करण्यास बाहेर पडले त्यामुळे शनिवारी सकाळपासूनच मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर वाहनांची संख्या वाढली होती. बोरघाट परिसरात वाहतूक अतिशय धिम्या गतीने सुरू आहे. वाहनांच्या सात ते आठ किलोमीटरच्या रांगा लागल्याचे दिसून येत होते.

घाट परिसरात वाहने बंद पडण्याच्या घटनाही घडत आहेत. त्यामुळे वाहतूक कोंडीची समस्या अधिक बिकट होत आहे. वाहतूक पोलीसांकडून महामार्गावरील वाहतूक सुरळीत व्हावी यासाठी कसोशीने प्रयत्न सुरू आहेत. मात्र वाहनांची संख्या प्रचंड असल्याने वाहतूक नियमन करणे अवघड झाले असलेच दिसून येत आहे.

सकाळी 9 वाजल्या पासून खालापूर टोल नाक्यावर ८ किलोमीटर रांगा लागलेल्या दिसत होत्या. एरव्ही 10 मिनिटांत हे अंतर पार करता येते. मात्र शनिवारी घाट परिसर पार करण्यासाठी एक ते दीड तास लागत होता. सायंकाळ नंतर वाहनांची संख्या कमी होण्याची अपेक्षा आहे.