नवी दिल्ली : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे महायुती सरकारमधील मतभेदांवर तोडगा काढण्यासाठी दिल्लीत दाखल झाल्याचे मानले जात असले तरी, शिवसेनेच्या ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे हेही राजधानीत मुक्कामी आले. त्यामुळे बुधवारी दिवसअखेर शिंदेंना एकाच वेळी दिल्लीतून आजी-माजी मुख्यमंत्र्यांविरोधात शड्डू ठोकावे लागल्याचे चित्र उभे राहिले.

दिल्लीमध्ये बुधवारी एकनाथ शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. संसदेच्या शहांच्या दालनामध्ये शिंदे यांनी पक्षाच्या खासदारांसह शहांची भेट घेती, त्यानंतर शिंदेंनी स्वतंत्रपणे शहांशी चर्चा केली. शहांच्या भेटीनंतर पंतप्रधानांच्या लोककल्याण मार्गावरील निवासस्थानी शिंदे यांनी सहकुटुंब भेट घेतली असली तरी, दोन्ही नेत्यांनी स्वतंत्रपणे चर्चा केली. या दोन्ही भेटीतील राजकीय चर्चेबाबत शिंदेंनी मौन बाळगले. मात्र, गाठीभेटी घेतल्यानंतर कुठल्याही अडचणीतून सकारात्मक मार्ग निघू शकतो, असे शिंदे म्हणाले.

गेल्या आठवड्यामध्ये अमित शहांना भेटण्यासाठी शिंदे दिल्लीमध्ये आले होते पण, शहांशी त्यांची भेट होऊ शकली नाही. या दिल्लीदौऱ्यामध्ये शिंदेंनी शहांशीच सविस्तर चर्चा केली असे नव्हे तर मोदींच्या निवासस्थानीही ते तासाभराहून अधिक वेळ होते. मोदी व शहांची भेट घेतल्यानंतरही शिंदेंनी बुधवारी रात्री दिल्लीत तळ ठोकला असल्याने चर्चांना उधाण आले.

शिंदे गुरुवारी दुपारनंतर दिल्ली सोडणार आहेत. त्यामुळे दिवसभरात शिंदे पुन्हा काही राजकीय भेटीगाठी घेण्याची शक्यता वर्तवली जात आहे. गेल्या आठवड्यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संसदेत अमित शहांशी सुमारे २० मिनिटे चर्चा केली होती. त्यानंतर मंत्रिमंडळातील बदलांची चर्चा होती. शिंदेंच्या सलग दुसऱ्या दिल्लीवारीमुळे महायुतीमध्ये फडणवीस व शिंदे यांच्यातील मतभेद तीव्र झाल्याची चर्चा तीव्र झाली.

उद्धव ठाकरेही दिल्लीत

शिंदेंच्या भाजपच्या नेत्यांशी चर्चा सुरू असतानाच ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे दिल्लीत येऊन दाखल झाले. उद्धव व आदित्य ठाकरे यांनी बुधवारी ६ जनपथवर जाऊन राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. ठाकरे गुरुवारी संसदेतील पक्षाच्या कार्यालयाला भेट देणार असून काही राजकीय नेत्यांनाही भेटणार आहेत. शिंदेंनंतर लगेच उद्धव ठाकरेही संसदेत जाणार असल्यामुळेही तर्कवितर्क केले जात आहेत.

गुरुवारी दिवसभर दिल्लीत उद्धव ठाकरेंच्याही भेटीगाठी होतील. त्याचवेळी शिंदेही दिल्लीत असतील. ह्यआम्ही लोकांच्या कल्याणासाठी लोककल्याण मार्गावर जातो, ते (उद्धव ठाकरे) मात्र जनपथावर जातातह्ण, असा टोमणा शिंदे यांनी बुधवारी ठाकरेंवर शाब्दिकवार केला. ठाकरे यांची गुरुवारी दिल्लीत सकाळी ११ वाजता पत्रकार परिषद होणार असून दोन्ही नेत्यांमध्ये कलगीतुरा रंगण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

उद्धव ठाकरे गुरुवारी काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांची भेट घेणार असून इंडिया आघाडीच्या नेत्यांच्या बैठकीमध्ये सहभागी होती. राहुल गांधी यांच्या निवासस्थानी स्नेहभोजनाचाही कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. ठाकरे शुक्रवारी दुपारी मुंबईला रवाना होणार आहेत.