संगमेश्वर येथील विद्यार्थ्यांची कल्पकता, ग्रामीण भागातील कलाकारांना व्यासपीठ

रत्नागिरी: रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर येथील प्रदीर्घ शैक्षणिक परंपरा लाभलेल्या पैसा फंड हायस्कूलच्या माजी विद्यार्थ्यांनी करोनाकाळाचा सदुपयोग करून प्रेक्षणीय कला दालन साकारले आहे.

Vidya Prabodhini students from Kolhapur top in the UPSC final result
युपीएससीमध्ये कोल्हापूरचा झेंडा; विद्या प्रबोधिनीच्या विद्यार्थांची अंतिम निकालात बाजी
UPSC Result, UPSC Result Marathi News, UPSC Civil Services Final Result 2023 Out
यूपीएससी परीक्षेत विदर्भाचा डंका, नागपूरच्या पाच विद्यार्थ्यांनी मारली बाजी
Nursing Student s Suicide Prompts Summer Vacation
नागपुरात विद्यार्थिनीच्या आत्महत्येनंतर वसतिगृह रिकामे, महाविद्यालय प्रशासनाने मग…
MBBS student medical Nagpur
नागपूर : ‘एमबीबीएस’च्या विद्यार्थ्याने स्वत:ला खोलीत कोंडले !

संगमेश्वरातील काही दूरदृष्टीच्या व्यापाऱ्यांनी स्वातंत्र्यापूर्वी १९२९ मध्ये स्थापन केलेल्या या शिक्षण संस्थेत एकविसावे शतक सुरू झाले तरी स्वतंत्र कला वर्ग नव्हता. ही उणीव दूर करण्याची मागणी विद्यार्थ्यांनी केली असता तत्कालीन संस्थाचालकांनी शाळेलगत असलेली डोंगरउताराची जागा देऊ केली. मात्र आर्थिक बळाअभावी तेथे वर्ग बांधण्याबाबत असमर्थता दर्शवली. पण शाळेचे मुख्य कला शिक्षक जे. डी. पराडकर यांनी ही एक मोठी संधी मानून शाळेतील  कलेची आवड असणाऱ्या मुलांना एकत्र केले आणि स्वतंत्र कला वर्गाची गरज आणि महत्त्व पटवून दिले. त्यानंतर मुलांनी शनिवार-रविवारी सुट्टी न घेता श्रमदान करुन प्रथम जागेची समपातळी केली. स्थापत्य अभियंता असलेली शाळेची माजी विद्यार्थीनी मनीषा रहाटे हिने कर्तव्य भावनेतून इमारतीचा आराखडा तयार करून दिला. तिनेच रेखाटलेल्या एका चित्राचा दर्जा पाहून मुंबईतील एका संस्थेने एक लाख रुपयांची मदत दिली. त्यामुळे कला वर्गाच्या बांधकामाने वेग घेतला. स्थानिक व्यापाऱ्यांसह, माजी विद्यार्थी, उद्योजक असे अनेक मदतीचे हात पुढे आले आणि जेमतेम वर्षभरात स्वतंत्र दुमजली देखणी इमारत उभी राहिली. शासनाच्या रेखाकला परीक्षेसाठी या कला वर्गात मुलांसाठी मोफत मार्गदर्शन वर्ग सुरू करण्यात आला. या मार्गदर्शन वर्गामुळे रेखाकला परीक्षेला प्रविष्ट होणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या वाढली . दहावी- बारावीनंतर कलाशिक्षण घेण्याचा कल वाढून पैसा फंडसह आजूबाजूच्या शाळांतील मुले येथे प्रवेश घेऊ लागली .

या वर्गाचा वरचा मजला प्रात्यक्षिकांसाठी तयार करण्यात आला. येथे मुंबई, पुणे, कोल्हापूर तसेच कोकणच्या विविध भागांतील नामवंत कलाकारांची प्रात्यक्षिके आयोजित केली जाऊ लागली. या वर्गाचे कला दालनात रूपांतर करण्याचा मानस होता. मात्र निधी आणि चित्रे – शिल्पे जमवणे हे परत मोठे आव्हान होते. त्या दृष्टीने संधी शोधत असतानाच २०१९ मध्ये करोनाचा उद्रेक सुरू झाला. प्रशालेत विद्यार्थी येत नसल्याने आता या वेळेचा उपयोग कसा करायचा? यातूनच पैसा फंड कला दालन या प्रकल्पाची मुहूर्तमेढ रोवली गेली. प्रशालेतील कला पदवीधर माजी विद्यार्थी हेमंत सावंत, प्राची रहाटे आणि स्नेहांकित पांचाळ हे विद्यार्थी पुढे आले आणि कला दालन साकारू लागले. येथील विद्यार्थ्यांनी पूर्वी केलेले काम लक्षात घेऊन देणगीदारांनी पुन्हा उदार हस्ते मदत केली आणि या सर्व प्रयत्नांमधून अतिशय प्रेक्षणीय कला दालन आकारास आले.

प्रेक्षणीय दालन

या दालनाच्या प्रवेशद्वाराजवळ उभी केलेली फायबरची ९ फूट उंच पेन्सिल आणि दालनातील भिंतीवर साकारलेले थ्री डी पेंटिंग या प्रकल्पामागील कल्पकता आणि भव्यता प्रभावीरीत्या व्यक्त करते. करोनामुळे लागू करण्यात आलेल्या टाळेबंदीच्या १५ महिन्यांच्या काळात ७० कलाकृती, १० शिल्पे जमा करून त्यांना फ्रेम करणे, पेडलस्टल बनवणे इत्यादी कामे अक्षरश: झपाटल्यासारखी पूर्ण करण्यात आली.

मुंबई-पुण्यासह विविध शहरांतील पर्यटक हे कला दालन पाहून या प्रयत्नांचे मनापासून कौतुक करत आहेत. ग्रामीण भागातील कलाकारांची ही कला पाहावी आणि या कलाकारांना एक व्यासपीठ मिळून त्यांच्या कलाकृतींची विक्री व्हावी, हाही या कला दालनाचा  उद्देश आहे, असे पराडकर यांनी नमूद केले.  विद्यार्थ्यांच्या या कला सेवेची दखल घेऊन मुंबई येथील आर्ट व्हिजन ग्रुपतर्फे  या कला दालनाला राजा रविवर्मा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले आहे.

कलासाधना.. प्रशालेच्या कला विभागाने सन २००० साली कलासाधनाह्ण हे चित्रकला वार्षिक सुरू केले. पाचवी ते बारावीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या उत्तम कलाकृती एकत्र करून दर वर्षी २६ जानेवारीला या कला साधना चित्रकला वार्षिकचे प्रकाशन केले जाते. कलासाधनात आपली कलाकृती लागावी म्हणून मुलांमध्ये परस्परांत स्पर्धा निर्माण झाली. याबरोबरच प्रशालेकडे विद्यार्थ्यांच्या कलाकृतींचा मोठा संग्रह तयार झाला. गेली २२ वर्षे हा उपक्रम अखंडपणे सुरू आहे आणि यामधून प्रशालेच्या कला विभागाकडे सुमारे बाराशे कलाकृतींचा संग्रह झाला आहे. विशेष म्हणजे करोनाकाळात सलग दोन वर्षे विद्यार्थ्यांनी घरून कलाकृती पाठवल्याने या उपक्रमात खंड पडला नाही.