सोलापूर महानगरपालिकेचे धडाकेबाज आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांच्या विरोधात सत्ताधारी नगरसेवकांनी गेल्या महिन्यात पाणी प्रश्नाची ढाल पुढे करून अवमान केल्यानंतर मन:स्ताप होऊन थेट विनंती बदली अर्ज शासनाकडे पाठवून ते निघून गेले होते. त्याचे तीव्र पडसाद उमटून जनआंदोलन झाल्यानंतर शासनाने गुडेवार यांची विनंती बदलीचा विचार न करता त्यांना महापालिकेत परत पाठविले होते. परंतु त्या वेळी त्यांनी केलेला विनंती बदली अर्ज निकाली न काढता त्याचाच नेमका आधार घेऊन आता त्यांची बदली करण्याचा डाव साधला गेल्याचे सांगितले जाते.
आयुक्त गुडेवार यांची अवघ्या अकरा महिन्यातच बदली झाल्यामुळे सत्ताधाऱ्यांच्या विरोधात नागरिकात नाराजीचे सावट पसरले असून त्यावरून राजकारणही रंगू लागले आहे. काँग्रेसचे नेते सुशीलकुमार शिंदे व गेल्या २५ पासून महापालिकेचे कारभारी असलेले त्यांचे सहकारी विष्णुपंत कोठे यांच्यातील शीतयुध्दात कोठे यांनी बाजी मारल्यामुळे त्यात गुडेवार यांचा बळी देण्यात आल्याचा राजकीय अन्वयार्थ लावला जात आहे. शिंदे यांच्यासह आमदार प्रणिती शिंदे व आमदार दिलीप माने यांच्या दबावामुळेच गुडेवार यांची बदली करणे शासनाला भाग पडल्याचा आरोप विरोधी पक्षांनी केला आहे. तर त्याचा स्पष्ट शब्दात इन्कार करीत गुडेवार यांची बदली प्रशासकीय कारणावरुन झाल्याचा दावा सत्ताधारी काँग्रेसच्यावतीने केला जात आहे.
यासंदर्भात माहिती घेतली असता आयुक्त गुडेवार हे अकरा महिन्यांपूर्वी कारभाऱ्यांची दुकानदारी बंद करण्यासाठी महापालिकेत रुजू झाल्यानंतर पारदर्शक व स्वच्छ आणि विकासाभिमुख कारभार करून त्यांनी जनमानसात आपली प्रतिमा उंचावली होती. तर राजकीय पुढाऱ्यांचे हितसंबंध धोक्यात आल्यामुळे अखेर गुडेवार यांना परत पाठविण्याचे प्रयत्न हाती घेण्यात आले. यात गेल्या मुहिन्यात पाणी प्रश्नाचे निमित्त साधून सत्ताधारी नगरसेवकांनी आयुक्तांच्या दालनासमोर ठिय्या आंदोलन करताना अवमानकारक भाषा वापरली होती. त्यामुळे गुडेवार यांनी वैतागून विनंती बदलीचा अर्ज शासनाकडे पाठवून रजेवर जाणे पसंत केले होते. त्यावेळी अवघे सोलापूरकर गुडेवार यांच्या बाजूने रस्त्यावर उतरले असता शासनाने गुडेवार यांना पालिकेत परत पाठविले होते. परंतु त्यांचा विनंती बदली अर्ज त्याचवेळी निकाली काढला नव्हता. परंतु आता नेमक्या याच अर्जाचा आधार घेऊन शासनाने त्यांची बदली करून डाव साधल्याचे पालिका वर्तुळात बोलले जात आहे.
दरम्यान, आयुक्त गुडेवार यांच्या बाजूने गेल्या महिन्यात ठामपणे उभे राहणाऱ्या पालिका कर्मचारी संघटनेने प्रत्यक्षात गुडेवार यांच्या बदलीनंतर सोयीस्कर मौन बाळगल्यामुळे सर्वत्र टीका होऊ लागली. त्यामुळे अखेर कर्मचारी संघटनेने बुधवारी काळ्या फिती लावून काम करून औपचारिकता पार पाडली. गुडेवार यांच्या बदलीच्या निषेधार्थ उद्या गुरूवारी पुकारलेल्या ‘सोलापूर बंद’ मध्ये पालिका कर्मचारी सहभागी होणार नाहीत,असे संघटनेच्यावतीने स्पष्ट करण्यात आले आहे. अवघ्या अकरा महिन्यात पालिकेची आर्थिक स्थिती भक्कम करून कर्मचाऱ्यांना ४० टक्क्य़ांपर्यंत घसघशीत वेतनवाढ देणाऱ्या आयुक्त गुडेवार यांच्याविषयी कर्मचारी संघटनेने कृतज्ञता न बाळगता उलट, कृतघ्नताच दाखविल्याची प्रतिक्रिया कर्मचाऱ्यांत व्यक्त होत आहे.