scorecardresearch

मनसेला सोबत घेतलं तर भाजपाला देशपातळीवर नुकसान होणार – रामदास आठवले

रिपब्लिकन पक्ष असताना मनसेची अजिबात आवश्यकता नाही, असंही म्हणाले आहेत.

मनसेला सोबत घेतलं तर भाजपाला देशपातळीवर नुकसान होणार – रामदास आठवले
(संग्रहीत)

केंद्रीयमंत्री आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे प्रमुख रामदास आठवले यांनी राज्यातील राजकीय परिस्थितीवर भाष्य केले आहे. तसेच, सध्या मागील काही दिवसांपासून मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि भाजपा नेत्यांची गाठीभेटी वाढल्याचेही दिसत आहे, यामुळे आगामी मुंबई महापालिका निवडणुकीत भाजपा मनसे युती होणार असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. याबाबत रामदास आठवले यांनी आपली भूमिका जाहीर केली आहे. एवढंच नाहीतर मनसेला बरोबर घेतलं तर भाजपाला देशपातळीवर नुकसान होईल. रिपब्लिकन पक्ष असताना मनसेची अजिबात आवश्यकता नाही. असंही त्यांनी बोलून दाखवलं आहे.

…त्यामुळे खरी शिवसेना एकनाथ शिंदेंचीच; धनुष्यबाण निशाणीही त्यांनाच मिळणार – रामदास आठवले

रामदास आठवले म्हणाले, “माझं मत असं आहे की मनसेची काही आवश्यकता नाही. रिपब्लिकन पक्ष असताना मनसेची अजिबात आवश्यकता नाही. आता एकनाथ शिंदेंचा गटदेखील आपल्यासह आलेला आहे. मागील वेळी शिवसेना आणि आम्ही स्वतंत्र लढलो होतो. भाजपी आणि आरपीआय एकत्र आणि शिवसेना वेगळी लढली होती. तरी देखील भाजपा आणि आरपीआयने जवळपास ८२ जागा निवडून आणल्या होत्या. त्यामुळे आता एकनाथ शिंदेंची शिवसेना आमच्या बरोबर आलेली असल्याने, आम्हाला मुंबई महापालिका निवडणुकीची अजिबात चिंता नाही. मुंबई महापालिकेत स्पष्ट बहुमतापेक्षाही अधिक जागा आम्हाला मिळतील, अशी आम्हाला अपेक्षा आहे.” टीव्ही ९ ला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते.

…पण त्यांना मतं मिळत नाहीत –

तसेच, “राज ठाकरे हे राज्यातील सक्रीय नेते आहेत, ते चांगलं भाषण करतात. त्यांच्या सभादेखील मोठ्या होतात, पण त्यांना मतं मिळत नाहीत. अशाप्रकारची परिस्थिती आहे. राज ठाकरेंना सोबत घ्यावं या मताचा मी अजिबात नाही. राज ठाकरेंची अजिबात आवश्यकता नाही.” असं आठवलेंनी स्पष्टपणे सांगितलं.

फायदा होण्यापेक्षा नुकसान होण्याची जास्त शक्यता –

याचबरोबर, “राज ठाकरेंना बरोबर घेतलं तर उत्तर भारतीयांची, दक्षिण भारतीय लोकांची मतं ही मतं आपल्याला मिळणार नाहीत. मनसेशी युती केली तर भाजपाला देशपातळीवर नुकसान होऊ शकतं. भाजपाला त्यांना बरोबर घेणं परवडणार नाही. त्यांना आपल्या बरोबर आणून फायदा होण्यापेक्षा नुकसान होण्याची जास्त शक्यता आहे. दलित समाज आता जो मोठ्याप्रमाणावर भाजपासोबत आहे, त्यांच्यामध्ये देखील गैरसमज होऊ शकतो.” असा यावेळी सूचक इशारादेखील दिला.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

ताज्या बातम्या