सातारा : साताऱ्यातील एका वृत्तपत्राच्या कार्यालयात बेकायदा प्रवेश करून तोडफोड, चोरी आणि संपादकाला जिवे मारण्याच्या धमकी प्रकरणी सातारा पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. नितीन जाधव, नितीन गायकवाड आणि दिलावर शेख अशी अटक केलेल्या तिघांची नावे आहेत. संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची मागणी साताऱ्यातील पत्रकार संघटनांनी केली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, की १३ जून रोजी पोवई नाका येथील बालाजी प्रेस्टीज चेंबर्स इमारतीत असलेल्या या वृत्तपत्राच्या कार्यालयात गाळामालक नितीन बजरंग जाधव, त्याची पत्नी आणि अनोळखी दोन ते तीन व्यक्तींनी अनधिकृतपणे कुलूप तोडून प्रवेश केला. त्यानंतर ३० जून रोजी कार्यालयात घुसून संगणक, सीसीटीव्ही, फर्निचरची तोडफोड करण्यात आली.

महत्त्वाची कागदपत्रे फाडून पाच हजार रुपयांची रोकडही लंपास करण्यात आली. एकूण पाच ते सहा लाख रुपयांचे नुकसान झाल्याचे वृत्तपत्राचे संपादक पद्माकर चंद्रकांत सोळवंडे यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत नमूद केले आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

याबाबत नितीन जाधव यांना अगोदरच अटक करण्यात आली होती. पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक राजेंद्र मस्के यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथकाने मुंबईत छापे टाकून नितीन गायकवाड आणि दिलावर शेख यांना ताब्यात घेतले.