अजितदादांनी आज अनेक गोष्टींची चर्चा केली कोण मुख्यमंत्री झाले? कुठले मुख्यमंत्री झाले असं अजितदादा म्हणाले. पण एका गोष्टीचं दुःख मला वाटतं आहे. संधी मिळाली असतानाही अजितदादांना शरद पवारांनी मुख्यमंत्री केलं नाही. २००४ मध्ये संधी होती. तुमचे जास्त लोकं निवडून आले होते. तुमच्या कराराप्रमाणे ज्याचे जास्त त्याचा मुख्यमंत्री होणार होता. पण ती संधी तुम्हाला मिळाली नाही असं म्हणत अजित पवार यांना विधानसभेत देवेंद्र फडणवीस यांनी खुमासदार टोला लगावला आहे.

अमृता फडणवीसांबाबत अजित पवारांना काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?
अजितदादांनी सांगितलं की एकदा अमृताशी बोला. पण दादा हे बोलताना तुम्ही सुनेत्राताईंना विचारलं होतं का? असा प्रतिप्रश्नही देवेंद्र फडणवीस यांनी विचारला आहे. तुमच्या मंत्रिमंडळात एकही महिला मंत्री नाही. याबाबत अमृता वहिनींना सांगू का ? असा प्रश्न अजित पवार यांनी विचारला होता त्या प्रश्नाला देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिलं.

आणखी काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?
अजित पवार यांचं भाषण नेहमीच रोखठोक असतं. पण, यंदा १०० टक्के भाषण अजित पवारांचं वाटत नव्हते. ५० टक्के जयंत पाटील यांचही होतं. जयंत पाटील सभागृहात नसल्याने अर्ध भाषण लिहून दिलं, असा भास तुमच्या भाषणातून होत होता. वीज तोडण्याचा जीआर मी ट्वीट देखील केला. फेसबुकर टाकला आणि सगळ्यांना पाठवला देखील, तरीही तुम्हाला कसं काय सापडला नाही. त्यामुळे दादा तुम्ही मला आता ट्वीटरवर फॉलो करा, असा टोला उपमुख्यमंत्री फडणवीसांनी अजित पवारांना लगावला.

अजित पवार काय म्हणाले होते?
महाविकास आघाडी सरकार असताना उद्धव ठाकरे आमचे मुख्यमंत्री होते. आता तुम्ही सरकारमध्ये काम करत आहात. तुम्हाला ठाणे जिल्ह्यात काम करताना किती अडचणी येतात स्वतःला विचारावा. तीच गोष्ट पालघर जिल्ह्याच्या बाबतीत घडते आहे. शिंदे गटाचं कुणी आलं की त्याचं काम लगेच होतं. चंद्रकांतदादा किंवा मुनगंटीवार कुणीही विरोध करा पण ही वस्तुस्थिती आहे असं अजित पवार यांनी म्हटलं होतं. आमचं सरकार असताना जेव्हा उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते तेव्हा कधी इगो आड आला नाही असंही अजितदादा म्हणाले होते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

२००९ मध्ये काय घडलं होतं?
२००९ मध्ये काँग्रेसला ६९ तर राष्ट्रवादी काँग्रेसला ७१ जागा मिळाल्या होत्या. ज्या पक्षाचे आमदार जास्त त्या पक्षाचा मुख्यमंत्री होईल असा ठराव या दोन्ही पक्षांमध्ये झाला होता. २००४ च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला मागे टाकत राष्ट्रवादी काँग्रेसने ७१ जागा जिंकल्या होत्या. मात्र पक्षात अंतर्गत कलह होऊ नयेत किंवा इतर पाडापाडीचं राजकारण होऊ नये म्हणून शरद पवार यांनी त्यावेळी मुख्यमंत्रीपद हे काँग्रेसला दिलं होतं. त्यामुळे अजित पवार हे संधी मिळूनही मुख्यमंत्री झाले नाहीत. त्यावेळी म्हणजेच २००४ मध्ये विलासराव देशमुख हे राज्याचे मुख्यमंत्री झाले. हाच संदर्भ घेत आज देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवार यांना टोला लगावला आहे.