अलिबाग : नियमात नसतानाही कर्ज मंजूर करणे, खोटे वेतन पत्रक देणे, असा गैरप्रकार करून अलिबाग शहरातील स्टेट बँक ऑफ इंडिया, श्रीबाग शाखेतील तत्कालीन शाखा व्यवस्थापक, क्षेत्रीय अधिकारी व कर्जदारांनी बँकेची ४१ लाख ६७ हजार ६६७ रुपयांची फसवणूक केली आहे. याबाबत अलिबाग पोलीस ठाण्यात २७ जणांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. यामध्ये स्थानिकांसह ठाणे जिल्हा व गुजरात राज्यातील आरोपींचा समावेश आहे.

बँकेचे शाखा व्यवस्थापक संतोष यमगेकर यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार शैशव नलावडे हे २ जुलै २०१८ ते २४ मे २०२१ या कालावधीत श्रीबाग येथील स्टेट बँकेत शाखा व्यवस्थापक म्हणून काम पहात होते तर, अमिताभ गुंजन हे क्षेत्रीय अधिकारी म्हणून होते. श्रीबाग एसबीआय शाखेचे ऑडिट २६ मे २०२२ रोजी पुणे येथील ऑडिट विभागाकडून झाले. त्यामध्ये नलावडे आणि गुंजन या दोघांनी मिळून एक्स्प्रेस क्रेडिट लोन या योजनेअंतर्गत ६५ जणांना वेगवेगळ्या रकमेचे कर्ज मंजूर केल्याचे निर्दशनास आले. त्यामध्ये कर्जदार कर्ज मंजूर करण्याच्या कोणत्याही नियमात बसत नसतानाही त्यांचे कर्ज मंजूर झाल्याचे आढळून आले.

हेही वाचा : जाती व्यवस्थेविरुध्द साहित्यिकांनी आज बोलण्याची गरज – रामदास फुटाणे

खोटे वेतन पत्रक, बँक स्टेटमेंट देऊन त्यांच्याकडूही दिशाभूल करून वैयक्तिक कर्ज मिळवल्याचे निष्पन्न झाले. यातील ३८ जणांनी कर्जाची रक्कम पूर्ण भरून त्यांचे कर्जाचे खाते बंद केले. त्यापैकी २७ जणांनी खोटे दस्तऐवज देऊन कर्ज मिळविले. या २७ जणांची कोणतीही पडताळणी न करता कर्ज मंजूर करण्यामध्ये तत्कालीन शाखा व्यवस्थापक नलावडे व फिल्ड व्यवस्थापक गुंजन यांनी संगनमताने बँकेची आर्थिक फसवणूक केल्याचे निष्पन्न झाले. हा प्रकार या सर्वांनी २०१८ पासून २०२१ या कालावधीत केल्याची तक्रार यमगेकर यांनी केली आहे.

हेही वाचा : कुणबी शब्दाची लाज वाटते त्यांनी शेती विकून चंद्रावर जावे – जरांगे पाटील

“श्रीबागमधील स्टेट बँकेचे तत्कालीन शाखा व्यवस्थापक, फिल्ड ऑफिसर व २७ कर्जदारांविरोधात फसवणूक केल्याबाबत तक्रार नोंदवण्यात आली आहे. या गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस करीत आहेत. अद्याप कोणाला ताब्यात घेण्यात आलेले नाही.” – शिरीष पवार, पोलीस निरीक्षक, अलिबाग

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“बँकेच्या ऑडिटमध्ये खोटे दस्तऐवज देऊन कर्ज मिळवणे, तत्कालीन शाखा व्यवस्थापक व फिल्ड ऑफिसर यांनी कोणतीही पडताळणी न करता संगनमताने कर्ज दिल्याचे निष्पन्न झाले आहे. बँकेची 41 लाख रुपयांची फसवणूक झाल्याबाबत 27 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.” – संतोष यमगेकर, शाखा व्यवस्थापक.