कराड: तासवडे (ता. कराड) औध्योगिक वसाहतीतील (एमआयडीसी) एका कंपनीत टाकी वेल्डिंगचे काम करत असताना अचानक गुदमरल्याने वहागाव (ता. कराड) येथील एकोणीसवर्षीय युवक विजय पवार (वय १९, रा. वहागाव, ता. कराड) याचा मृत्यू झाल्याची घटना घडली. यानंतर परिसरात तणावाचे वातावरण होते.
तळबीड पोलिसात या घटनेची नोंद झाली असून, पोलिसांनी याप्रकरणी कंपनी मालकासह चौघांवर गुन्हा दाखल करून त्यांना ताब्यात घेतले आहे. विवेक पवार याची घरची परिस्थिती बेताची असून, त्याच्या मागे आई, वडील व बहीण असा परिवार आहे. विवेकच्या आकस्मित निधनाने कुटुंबातील कर्ती-सावरती व्यक्ती गमावल्याने संपूर्ण वहागावावर शोककळा पसरली होती. गावातील प्रत्येक व्यक्ती त्याच्या निधनाबद्दल हळहळ व्यक्त करत होता.
दुर्घटना घडलेल्या कंपनीचे मालक श्रीकांत श्रीनिवास कुलकर्णी (रा. कराड), कामगार ठेकेदार मयूर हणमंत पवार (रा. चचेगाव, ता. कराड), पर्यवेक्षक (सुपरवायझर) सचिन दिलीप पवार (रा. तांबवे, ता. कराड) संकेत नंदकुमार सूर्यवंशी (रा. बेलदरे, ता. कराड) अशी त्यांची नावे आहेत.
याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, विवेक पवार हा तासवडे औध्योगिक वसाहतीतील कंपनीत कामास होता. दरम्यान, आज विवेक हा कंपनीत स्टेनलेस स्टीलच्या टाकीमध्ये वेल्डिंगचे काम करत होता. कंपनीचे मालक श्रीकांत कुलकर्णी तसेच कामगार ठेकेदार मयूर पवार यांनी योग्य त्या सुविधा न पुरविता, निष्काळजीपणे तसेच सोबत काम करणारे कामगार सचिन पवार व संकेत सूर्यवंशी यांनी विवेक पवार हा स्टेनलेस स्टीलच्या टाकीत काम करीत असताना व्यवस्थित लक्ष न दिल्यामुळे विवेक यास टाकीत श्वास न घेता आल्याने त्याचा गुदमरून मृत्यू झाल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
विवेक याचे वडील विजय पवार (रा. वहागाव) यांनी याबाबत रात्री उशिरा तळबीड पोलिसात फिर्याद दिली आहे. दरम्यान, रात्री उशिरा कराडच्या उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले व त्यानंतर रात्री उशिरा विवेक पवार याच्यावर वहागाव येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.
विवेक पवार यांचे कुटुंब मोलमजुरी करून उदरनिर्वाह करणारे असून, वडील विजय पवार हे रिक्षा व्यावसायिक आहेत. जीवनचरितार्थ चालविण्यासाठी या कुटुंबाने नेहमीच कष्ट केले आहेत. विवेक पवारने कराडच्या औध्योगिक प्रशिक्षण संस्थेत (आयटीआय) वेल्डिंग कोर्स पूर्ण केल्यानंतर काही दिवस तो परिसरात वेल्डिंगची कामे करत होता. सुस्वभावामुळे त्याचा मोठा मित्र परिवार होता.