नांदेड : जिल्ह्यातील अतिवृष्टी आणि पूरबाधित शेतकर्यांच्या विविध मागण्यांसाठी धर्माबाद तालुक्यातील कारेगाव फाटा येथे मागील अकरा दिवसांपासून साखळी उपोषण करणार्या तीन तालुक्यांतल्या शेतकर्यांच्या उपोषणाची शासन आणि प्रशासनाने योग्य ती दखल घेतली नसल्याच्या निषेधार्थ उपोषणार्थींतील संतोष कदम (रा.चोळाखा) या तरुण शेतकर्याने शुक्रवारी गावालगतच्या ओढ्यात उडी मारुन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्यामुळे एकच खळबळ उडाली.
वरील प्रकारानंतर शासन-प्रशासनाच्या बेपर्वाईबद्दल धर्माबाद-उमरी-नायगाव या परिसरातील शेतकरी आणि राजकीय कार्यकर्त्यांमध्ये संतप्त प्रतिक्रिया उमटली असून उपोषणार्थींच्या मागण्या तात्काळ मान्य करा, अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा स्वतंत्र भारती पार्टीचे शिवाजीराव शिंदे, शेतकरी संघटनेचे धोंडिबा पवार आणि शेतकरी संघर्ष समितीचे अध्यक्ष डॉ.भगवान मनूरकर यांनी सर्व संबंधितांना निवेदन पाठवून दिला.
नांदेड जिल्ह्यात मागील महिनाभरात अतिवृष्टी आणि पूर परिस्थितीमुळे हाहाकार उडाल्यानंतर सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींच्या रेट्यामुळे प्रशासकीय यंत्रणेने बाधित शेतीक्षेत्राचे पंचनामे करून शासनाकडे नुकसानभरपाईचा अहवाल पाठवला होता. त्यानुसार शासनाच्या महसूल व वनविभागाने गुरुवारी सायंकाळी मदतीसंदर्भातील निर्णय जारी केला. लोकप्रतिनिधींनी कोल्हापूरच्या धर्तीवर विशेष आर्थिक मदतीची मागणी केली होती; पण शासनाने ती धुडकावून लावत शेतकर्यांच्या तोंडाला पाने पुसले असल्याची संतप्त प्रतिक्रिया संदीपकुमार देशमुख बारडकर यांनी व्यक्त केली. शेतकर्यांची एकरी केवळ ३४०० रूपयांवर बोळवण केली असल्याचे त्यांनी नमूद केले.
शासन निर्णयाबाबत सत्ताधारी पक्षाच्या स्थानिक नेत्यांसह लोकप्रतिनिधींनी मौन बाळगले आहे. अपेक्षित आणि नुकसानीप्रमाणे मदत न मिळाल्यामुळे शेतकर्यांच्या असंतोषाची तीव्रता वाढलेली असतानाच धर्माबादजवळच्या घटनेने एकच खळबळ उडाली. संतोष कदम यांनी पुलावरून उडी मारत ओढ्यातील पाण्यात आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. पण त्याच्यामागे धावणार्या दत्ताहरी भंडारे या युवकाने पाठोपाठ पाण्यामध्ये उडी मारून कदम यास सुखरुप बाहेर काढले. शासनाने तुटपुंजी मदत जाहीर केल्यामुळे आपल्याला टोकाचे पाऊल उचलावे लागले, असे कदम यांनी नंतर सांगितले.
वरील प्रकारानंतर महसूल आणि पोलीस प्रशासनाची धावपळ बघायला मिळाली. तहसीलदार सुरेखा स्वामी, नायब तहसीलदार बी.आर.गावंडे यांच्यासह पोलिसांची यंत्रणाही घटनास्थळी पोहचल्याचे दिसून आले. शासन शेतकर्यांचे थट्टा करणार असेल, तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुतीला त्याचे गंभीर परिणाम दिसतील, असा इशारा मनूरकर यांनी दिला आहे