राहाता : शेततळ्यावर विद्युत पंप सुरू करण्यासाठी गेलेल्या पत्नीचा शेततळ्यात पाय घसरून पाण्यात पडल्याने तिला वाचविण्यासाठी पतीने शेततळ्यात उडी घेतली. हे दोघे बुडत असल्याचे पाहूण एका तरुणाने त्यांना वाचविण्यासाठी शेततळ्यात उडी घेतली. या घटनेत महिलेला वाचविण्यात यश आले, मात्र पती व तो तरुण शेततळ्यात बुडून मृत पावले. ही दुर्दैवी घटना तालुक्यातील अस्तगावच्या चोळकेवाडी येथे रविवारी घडली. याप्रकारणाने चोळकेवाडी, अस्तगाव परिसरात शोककळा पसरली आहे.

या दुर्घटनेत रामदास सखाहरी चोळके (वय ५६) व आदेश आण्णासाहेब नळे (वय २२) या दोघांचा मृत्यू झाला. रविवारी सकाळी सात वाजता रामदास सखाहारी चोळके व त्यांच्या पत्नी सुमनबाई चोळके हे दोघे त्यांच्या मालकीच्या शेततळ्यावर विद्युत मोटार सुरू करण्यासाठी जात होते. पुढे काही अंतरावर चालत असलेल्या सुमनबाई यांचा पाया शेततळ्याच्या प्लॅस्टिक कागदावरून घसरला. त्या पाण्यात पडून बुडू लागल्या. हे दृश्य पाहून पती रामदास सखाहरी चोळके यांनी काही क्षणाचाही विलंब न करता मोठ्याने ओरडत शेततळ्यात उडी घेतली. रामदास यांचा हा आवाज वस्तीवरील त्यांच्या सूनबाईंनी ऐकला.

त्यांनीही जोरात आवाज देत प्रसंगाची कल्पना आजूबाजूच्या रहिवाशांना दिली. वस्तीवरील तरुण आदेश आण्णासाहेब नळे यांनी ऐकून शेततळ्याच्या दिशेने धाव घेत शेततळ्यातील पती-पत्नी बुडत असल्याचे पाहताच क्षणाचाही विलंब न करता त्यानेही शेततळ्यात उडी मारली. आदेशने सुमनबाईंना ढकलत शेततळ्याच्या कडेला आणले. एव्हाना आजूबाजूचे रहिवासी दोर घेऊन तळ्यावर दाखल झाले होते. सुमनबाईंनी दोर पकडला. परंतु रामदास चोळके आणि आदेश नळे हे पोहता पोहता दम लागल्याने ते बुडू लागले. इतरांनी त्यांना वाचविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले पंरतु त्यांना यश मिळाले नाही. त्या दोघांचा मृत्यू झाला. जेसीबीच्या साह्याने शेततळे एका बाजूने उकरण्यात येऊन पाणी कमी झाल्यानंतर त्यांचे मृतदेह शेततळ्याच्या बाहेर काढण्यात आले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या घटनेत वाचलेल्या सुमनबाईंना तत्काळ प्रवरा ग्रामीण रुग्णालय लोणी येथे दाखल करण्यात आले. त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. या दुर्घटनेतील रामदास हे वारकरी सांप्रदायात होते, तर आदेश या तरुणाचा अद्याप विवाह झाला नव्हता. सायंकाळी या दोघांवर शोकाकुल वातावरणात तासाभराच्या अंतराने अंत्यसंस्कार करण्यात आले. या प्रकरणी राहाता पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.