सांगली : मराठा आंदोलक मनोज जरांगे-पाटील यांच्या स्वागत मिरवणुकीतील होत असलेल्या गर्दीचा फायदा घेऊन पाकिटमारी करणार्या नऊ जणांच्या टोळीला विटा पोलीसांनी अटक केली आहे. आरोपींकडून सुमारे दीड लाखांची रोकड हस्तगत करण्यात आली आहे. या टोळीने शुक्रवारी झालेल्या जरांगे पाटील यांच्या सांगली दौर्यावेळी मोठी हातसफाई केल्याचे दिसून आले होते.
याबाबत माहिती अशी की, जरांगे-पाटील यांचा मराठा आरक्षणाबाबत जनजागृती दौरा सध्या महाराष्ट्रभर सुरू आहे. शुक्रवार दि. १७ नोव्हेंबर रोजी त्यांची विटा, सांगली व इस्लामपूर येथे जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेपुर्वी मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी स्वागत मिरवणुक काढली होती. तसेच तासगावमध्येही जंगी स्वागत करण्यात आले होते. यावेळी हजारोंचा जनसमुदाय उपस्थित होता.




या गर्दीचा फायदा उठवत अनेक कार्यकर्त्यांच्या खिशातील पैसे हातोहात लंपास करण्यात आले होते. या प्रकरणी सहा जणांनी तासगाव व विटा पोलीस ठाण्यात अज्ञाताविरूध्द चोरीच्या तक्रारी दाखल केल्या होत्या. या प्रकरणी विटा पोलीस ठाण्याचे निरीक्षक संतोष डोके यांनी उप अधिक्षक पद्या कदम यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेला या चोरट्यांना गजाआड करण्याचे निर्देश दिले होते. या पथकाला विटा बस स्थानक परिसरात काही अज्ञात तरूण संशयास्पद स्थितीत असल्याची माहिती मिळाली. या सर्वांना संशयावरून ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांनी पाकिटमारी केल्याची कबुली दिली.
हेही वाचा : नाना पटोले म्हणतात, “मोदी जेथे जातात तेथे पराभव अटळ, भारतीय संघ जिंकला असता तर…”
या प्रकरणी सुरज उध्दव पवार (वय २७), रमाकांत आनंदा कांबळे (वय ३६), आकाश साहेबराव वाघमारे (वय २४), राजेश विठ्ठल शाहीर (वय ३४), अविनाश लालासाहेब कांबळे (वय २७), दत्ता लालासाहेब कांबळे (वय २८), अक्षय शिवाजी सनमुखराव (वय ३४), विलास लक्ष्मण शिंदे (वय २६ सर्व रा. राजीवनगर, लातुर) आणि बिलाल गुलाब नबी खान (वय ५४ रा. मालेगांव, जि. नाशिक) या नऊ जणांना अटक करण्यात आली आहे. या टोळीकडून चोरी केलेले १ लाख ३९ हजार २०० रुपये हस्तगत करण्यात आले आहेत. चोरट्यांच्या टोळीला गजाआड करण्याची कामगिरी करणार्या पथकामध्ये उप निरीक्षक सागर गायकवाड, उत्तम माळी, प्रमोद साखरपे, अमोल कराळे, महेश देशमुख, हेमंत तांबेवाघ, अक्षय जगदाळे, कृष्णत गडदे, वैभव कोळी, विकास जाधव, कॅप्टन गुंडवाडे प्रशांत चव्हाण आदींचा समावेश होता.