आज ऑस्ट्रेलियातील मेलबर्न स्टेडियमवर भारत विरुद्ध पाकिस्तानचा चुरशीचा सामना पाहायला मिळाला आहे. या ऐतिहासिक सामन्यात भारताने पाकिस्तानवर मोठा विजय संपादन केला आहे. सुरुवातीलाच भारताचे महत्त्वाचे खेळाडू बाद झाल्यानंतर पाकिस्तानचा विजय जवळपास निश्चित झाल्याचं चित्र होतं. पण भारतीय फलंदाज विराट कोहली आणि हार्दिक पंड्या यांनी तुफान कामगिरी करत विजय खेचून आणला आहे.

भारताच्या या ऐतिहासिक विजयानंतर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. दरम्यान, पुण्यात काही क्रिकेटप्रेमींनी भारताच्या विजयाचा जल्लोष भररस्त्यात साजरा केला आहे. यामुळे रस्त्यावर वाहतूक कोंडी झाल्याने पुणे पोलिसांनी क्रिकेटप्रेमींवर लाठीचार्ज केला आहे. पोलिसांच्या या कृत्यानंतर पुणेकरांकडून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहे.

हेही वाचा- IND vs PAK: सचिन तेंडुलकरही कोहलीचा फॅन; खास ट्वीट करत म्हणाला “१९ व्या षटकात तुला बघणं म्हणजे..”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मिळालेल्या माहितीनुसार, भारताने पाकिस्तानवर मात केल्यानंतर पुण्यातील क्रिकेटप्रेमी फर्ग्युसन कॉलेज रस्त्यावर जमले होते. यावेळी क्रिकेट चाहत्यांनी भररस्त्यात फटाक्यांची आतिषबाजी केली. शेकडो क्रिकेटप्रेमी रस्त्यावर जमल्याने याठिकाणी मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी झाली. ही कोंडी सोडवण्यासाठी पुणे पोलिसांनी क्रिकेटप्रेमींवर लाठीचार्ज केला आहे. या घटनेचे व्हिडीओ समोर आले असून सोशल मीडियात वेगानं व्हायरल होत आहेत. याबाबतचं वृत्त ‘टीव्ही ९ मराठी’ने दिलं आहे.