दिगंबर शिंदे

सांगली :  आपले राजकीय वारसदार म्हणून मुलगा प्रतिक पाटील यांच्या सार्वजनिक कार्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत  पाटील यांनी सहकारातून पायउतार होण्याचा निर्णय आज घेतला. आता कारखान्याच्या अध्यक्षपदाची सुत्रेही मुलाकडे दिली जाण्याची शक्यता असून सहकारामध्ये स्व. राजारामबापू पाटील यांच्या तिसऱ्या पिढीचा विनासायास प्रवेश होत आहे.

  लोकनेते राजारामबापू पाटील यांनी १९६८ मध्ये वाळवा कारखाना या नावाने उभारणी केली. बापूंच्या अकाली निधनानंतर आ. पाटील यांच्याकडे कारखान्याची सूत्रे आली. त्यांनी कारखान्याच्या माध्यमातूनच राजकीय जीवनालाही सुरूवात केली. सलग  दहा वर्षे अध्यक्ष पदाची धुरा सांभाळल्यानंतर  राज्यपातळीवर नेतृत्वाला अधिक चांगला न्याय देता यावा यासाठी विश्वासू सहकार्याकडे कारखान्याची जबाबदारी सोपवली असली तरी गेली ३६ वर्षे ते कारखान्याचे संचालकपदावर होते.  कारखान्यातून सहकारावर पकड मिळवत असतानाच त्यांनी राजकीय जीवनातही चांगले स्थान पटकावले. आमदारकीची संधीही त्यांना मिळालीच पण याचबरोबर राज्य मंत्रीमंडळामध्ये सलग नऊ वेळा अर्थमंत्री या नात्याने अर्थसंकल्प सादर केला. या बरोबच  गृह, पाटबंधारे, ग्रामीण विकास सारखी महत्वाची खातीही त्यांना मिळाली. याच बरोबर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष म्हणूनही त्यांच्याकडे पक्षाची राज्यस्तरावर जबाबदारी आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

गेली तीन वर्षे प्रतिक पाटील यांच्या राजकीय जीवनात पदार्पणाची चर्चा सुरू होती. महाविकास आघाडीची सत्ता होती, त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या संवाद यात्रेच्या निमित्ताने  प्रतिक यांना व्यासपीठावर अग्रस्थान देणे, त्यांच्यासाठी जत, सांगली विधानसभेबरोबरच वाळवा तालुययातील २८ गावांचा समावेश असलेल्या शिराळा मतदार संघातही चाचपणी सुरू आहे. कधी कधी सांगली लोकसभेसाठीही प्रतिक पाटील यांच्या नावाची चर्चा होते. आता कारखान्याच्या संचालक मंडळातील सहभागााने आ. पाटील यांनी आपला वारसदार घरच्याच मैदानातून पुढे आणला आहे. आता माजी अध्यक्ष पी. आर. पाटील यांना कारखान्याच्या व्यापातून विश्रांती दिली असली तरी राज्य साखर महासंघाचे अध्यक्षपद मिळाले आहे. आता अध्यक्ष पदीही मुलालाच संधी दिली जाण्याची शययताही वर्तवली जात असून त्या दिशेनेच अविरोध निवडीसाठी आठ दिवस तळ ठोकून आ. पाटील यांनी राजकीय गणितासोबतच सहकारातील गणितेही घातली असल्याचे मानले जात आहे. आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत होती. या मुदतील दाखल ३८ उमेदवारापैकी १७ जणांनी उमेदवारी मागे घेतल्याने संचालक मंडळाच्या २१ जागासाठी २१ उमेदवार रिंगणात उरले आहेत.