कराड : अयोध्येतील अद्वितीय अशा नव्याने उभारलेल्या राम मंदिरात प्रभू रामलल्ला मूर्ती प्राणप्रतिष्ठापना आणि मंदिर लोकार्पण सोहळ्यानिमित्ताने अवघ्या सातारा जिल्ह्यात एकच जल्लोष अन् महादिवाळी साजरी झाली.

विद्युत रोषणाई व फुलांच्या माळांची सजावट, परिसरात उजळणारे दिवे अशी सजलेली मंदिरे, भगवे ध्वज, झेंडे, श्री रामाचे भव्य कटाआउट, सुरेख रांगोळ्यांचा सडा यांनी सजलेले रस्ते व चौकात मोठ्या पडद्यावर अयोध्यापतीच्या मूर्ती प्राणप्रतिष्ठापना सोहळा अनुभवताना गोडाचे वाटप, जयघोष, पूजाअर्चा आणि दीपोत्सव असा आनंदसोहळा साजरा होत होता. ध्वनीक्षेपकावरील अयोध्या सोहळ्याच्या गीतांनी संपूर्ण दिवस दुमदुमून गेला होता.

मंदिरा-मंदिरांमध्ये श्रीरामरक्षा, मंत्रपठन, भजन, कीर्तन, महाआरती, प्रसादाचे वाटप असे असंख्य कार्यक्रम एकाचवेळी संपन्न होत होते. त्यामुळे एकंदरच भगवे राममय आणि चैतन्याचे वातावरण राहिले होते. पारंपारिक तसेच सांस्कृतिक पोशाखात हजारो रामभक्त सार्वजनिक ठिकाणी रामोत्सव पार पडताना दिसत होते. चौकाचोकात मोतीचूर लाडू वाटपाचा स्थानिक मंडळांचा उपक्रम रामोत्सवाला आणखी गोडवा देणारा होता.

आणखी वाचा-महाराष्ट्रातून अयोध्येला जाणाऱ्या रामभक्तांसाठी राहुल नार्वेकरांची मोठी घोषणा, म्हणाले…

श्री रामाची मंदिरे असलेल्या सज्जनगड, चाफळ, गोंदवले, रहिमतपूर, सातारा, फलटण, पाटण आदी ठिकाणी मंदिर समित्यांनी पूजेअर्चेसह कार्यक्रमांचे भव्यदिव्य आयोजन केले होते. श्री रामाचे दर्शन घेण्यासाठी दर्शनरांगा लागल्या होत्या. स्थानिक आमदार, खासदार आदी लोकप्रतिनिधीही रामभक्तांच्या खांद्याला खांदा लावून या उत्सवात उतरल्याने हा राष्ट्रीय महाउत्सव ‘न भूतो न भविष्यते’ असाच साजरा होत होता. रात्री उशिरापर्यंत महाआरती, मंत्रपठण, प्रसाद वाटप असे एक ना अनेक कार्यक्रम सुरूच राहणार आहे. अगदी वाड्यावास्त्यांवर अन् झोपडीतही हा उत्सव साजरा झाला.

साताऱ्यात खासदार उदयनराजे भोसले, आमदार शिवेंद्रराजे भोसले, भाजप जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम, फलटणमध्ये खासदार रणजितसिंह निंबाळकर, पाटणला मंत्री शंभूराज देसाई तर कराड शहरासह तालुक्यात डॉ. अतुल भोसले, मनोज घोरपडे, विक्रम पावसकर, एकनाथ बागडी, रामकृष्ण वेताळ या भाजप नेत्यांच्या नेतृत्वाखाली सलग कार्यक्रम व उपक्रम सुरु होते. अयोध्या राम मंदिर निर्माण न्यास, सज्जनगडचे श्री समर्थ सेवा मंडळ, विश्व हिंदू परिषद, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, भाजप, शिवसेना, बजरंग दल, हिंदू एकता, महाराष्ट्र नवनिर्माण सेना आदी हिंदुत्ववादी संघटनांचे कार्यकर्ते, त्यांच्याशी निगडीत संस्था, संघटनाचे असंख्य कार्यकर्ते लोकांना बरोबर घेऊन रामलल्ला प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचा आनंद धार्मिक विधी, कार्यक्रम व उपक्रमांनी द्विगुणित करीत होते. सामुदायिक श्रीरामरक्षा पठण व महायज्ञाचेही अनेक ठिकाणी आयोजन होते.

आणखी वाचा-सोलापुरात भक्ती, मांगल्यासह राममय भगवे वातावरण

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अयोध्येतील प्रभू रामलल्ला मूर्ती प्राणप्रतिष्ठापना आणि मंदिर लोकार्पण सोहळ्याचे थेट प्रक्षेपण मोठ्या पडद्यावरून पाहताना झालेला जल्लोष संस्मरणीय ठरताना हा दिवस या पुढे मराठी तिथीनुसार रामलल्ला प्राणप्रतिष्ठा दिन म्हणून साजरा करण्याचा मनोदय सार्वजनिक गणेश व नवरात्रोत्सवाचे कार्यकर्ते व्यक्त करीत होते. एकंदरच आजच्या संपूर्ण दिवसावर आणि समाजमनावर रामनामाचे, रामायणाचे गारुड पहावयास मिळाले.