अमरावती : न्यायाधीशांनी भारताच्या राज्यघटनेप्रमाणे सद्सद् विवेकबुद्धीने निर्णय देणे अपेक्षित आहे. लोक काय म्हणतील, ही भीती बाळगून जर न्याय निवाडे दिले गेले, तर तो खरा न्याय होऊ शकणार नाही, असे स्पष्ट प्रतिपादन सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश भूषण गवई यांनी येथे केले. अमरावती जिल्‍हा वकील संघाच्‍या वतीने पी.आर. पोटे एज्‍युकेशनल इन्स्टिट्यूटच्‍या परिसरातील स्‍वामी विवेकानंद सभागृहात बुधवारी रात्री आयोजित कार्यक्रमात सरन्‍यायाधीशांचा हृद्य सत्‍कार करण्‍यात आला, त्‍यावेळी ते बोलत होते.

सोहळ्याला माजी सरन्‍यायाधीश एन. व्‍ही. रमणा, उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती नितीन सांबरे, उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्ती अनिल किलोर, न्यायमूर्ती प्रवीण पाटील, अमरावतीचे प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश सुधाकर यार्लागड्डा, भूषण गवई यांच्‍या मातोश्री कमलताई गवई, पत्‍नी डॉ. तेजस्‍वीनी गवई यांच्‍यासह वकील संघाचे पदाधिकारी प्रामुख्‍याने उपस्थित होते.

सरन्‍यायाधीश भूषण गवई म्‍हणाले, १९७३ मध्ये १३ न्यायाधीशांच्या खंडपीठाने निर्णय दिला की, संसदेला संविधानात दुरूस्ती करण्याचा अधिकार आहे आणि यासाठी ती मुलभूत अधिकारांमध्ये दुरूस्ती करू शकते, पण संविधानाच्या मुलभूत रचनेत बदल करण्याचा अधिकार संसदेला नाही. यावेळी या खंडपीठाने असेही सांगितले की, मुलभूत अधिकार आणि मार्गदर्शक तत्वे दोन्ही संविधानाची आत्मा आहेत. ही तत्वे म्हणजे संविधानाच्या सुवर्ण रथाची दोन चाके आहेत.

सरन्यायाधीश म्हणाले, मध्यंतरी संविधानिक पदावर असलेल्या एका व्यक्तीने संसद सर्वोच्च असल्याचे वक्तव्य दिले होते. पण, संसद किंवा न्यायपालिका सर्वोच्च नाही, तर देशाची राज्यघटना सर्वोच्च स्थानी आहे. राज्यघटनेच्या चौकटीत सर्व स्तंभांनी वागले पाहिजे. राज्य घटनेने लोकांना अधिकार दिले, तसेच कर्तव्याची देखील जाणीव करून दिली आहे. न्यायाधीश हे जनतेच्या अधिकारांचे संरक्षण करणारे ‘कस्टोडियन’ आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

भूषण गवई यांनी यावेळी जुन्या आठवणींना उजाळा दिला. ते म्हणाले, मला आर्किटेक्ट व्हायचे होते, पण वडील दादासाहेब गवई यांची इच्छा मी वकील व्हावे, अशी होती. दादासाहेबांना वकील व्हायचे होते, पण चळवळीतील संघर्षामध्ये त्याचे ते स्वप्न पूर्ण होऊ शकले नव्हते. मी दादासाहेबांच्या आदेशांचे पालन केले. मला न्यायाधीश होण्याची संधी मिळाली, तेव्हा देखील मी द्विधा मन:स्थितीत होतो. तेव्हा दादासाहेब म्हणाले होते, सर्वोच्च न्यायालयात वकील झाला, तर खोऱ्याने पैसे कमावशील, पण न्यायाधीश बनला, तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या समतेच्या न्यायाच्या दृष्टीने हातभार लावू शकशील. कार्यक्रमाचे प्रास्‍ताविक जिल्‍हा वकील संघाचे अध्‍यक्ष अॅड. सुनील देशमुख यांनी केले. सचिव ॲड अमोल मुरळ यांनी आभार मानले.