सुरत येथे अडकून पडलेल्या मजुरांना घेऊन ओडिशाला निघालेल्या बसला अपघात झाल्याची घटना वर्ध्यात नागपूर-अमरावती महामार्गावर पहाटे घडली. या अपघातात जखमी झालेल्या मजुरांना सोडून चालकसह सर्वजण घटनास्थळावरुन निघून गेले आहेत.

नागपूर-अमरावती महामार्गावर कारंजा येथील पेट्रोल पंपाजवळ हा अपघात झाला. वाहतूक परवाना असलेल्या या बसमध्ये ५० लोक होते. २ मे रोजी निघालेली ही बस पहाटे वर्धा जिल्ह्यात येताच रस्त्यावर आलेल्या एका वन्य प्राण्याला वाचवताना चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले. त्यामुळे वेगात असलेली ही बस उलटली.

दरम्यान, या अपघातात जखमी झालेल्या तीन मजुरांना टोल नाक्यावरील कर्मचाऱ्यांनी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र, बसमधील चालक, वाहक व इतर प्रवासी घटनास्थळावरून निघून गेल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले आहे. अडकून पडलेल्या लोकांना परवाना घेऊन गावी परतण्याची मुभा केंद्र सरकारने दिली आहे. त्यानुसार हे मजूर गावी निघाले होते. जखमी मजुरांवर उपचार सुरू असून त्यांना पाठविण्याबाबत सध्या काहीच ठरले नसल्याचे कारंजा पोलिसांनी सांगितले.