टेलिव्हिजन विश्वातील एक अत्यंत दु:खद बातमी समोर येतेय. कलर्स वाहिनीवरील ‘महाकाली : अंत ही आरंभ है’ या मालिकेतील गगन कंग आणि अर्जित लवानिया या दोन अभिनेत्यांचा शनिवारी कार अपघातात मृत्यू झाला. उमरगावमधील मालिकेचं चित्रीकरण संपल्यानंतर हे दोघे मुंबईला परतत होते. मुंबई-अहमदाबाद महामार्गावर पालघरमधील मनोर येथे त्यांच्या कारचा अपघात झाला. महामार्गावर एका कंटेनरची त्यांच्या कारला जोरदार धडक बसली. या भीषण अपघातात दोघांचाही जागीच मृत्यू झाला.
‘महाकाली’ या मालिकेत गगन इंद्र तर अर्जित नंदीची भूमिका साकारत होता. उमरगावमध्ये शुक्रवारपासून मालिकेचं चित्रीकरण सुरु होतं. ते संपवून शनिवारी पहाटे दोघंही निघाले. मिळालेल्या माहितीनुसार गगन कार चालवत होता. या दोघांव्यतिरिक्त कारमध्ये असलेल्या आणखी एकाचाही जागीच मृत्यू झाला. हा व्यक्तीदेखील ‘महाकाली’ या मालिकेशी संबंधित होता असं म्हटलं जातंय.
‘गगन आणि अर्जित आमच्यात नाहीत यावर अजूनही आम्हाला विश्वास होत नाही. काही तासांपूर्वीच आम्ही एकत्र शूटिंग करत होतो आणि ते इथून निघाल्यानंतर काही वेळाने ही धक्कादायक बातमी मिळाली,’ अशी प्रतिक्रिया ‘महाकाली’ मालिकेतील त्यांची सहकलाकार निकीता शर्माने दिली.
Maharashtra: 3 people dead after a container hit a car on Mumbai- Ahmedabad highway near Palghar's Manor town. pic.twitter.com/JkXuNMzQCw
— ANI (@ANI) August 19, 2017