मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंगे काढण्यासाठी ४ तारखेचा अल्टिमेटम दिला असून राज्यात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे. दरम्यान याच पार्श्वभूमीवर पोलिसांनी प्रतिबंधात्मक कारवाई केली आहे. पोलीस महासंचालक रजनीश सेठ यांनी १५ हजार लोकांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आलेली असून १३ हजार लोकांना नोटीस पाठवण्यात आली असल्याची माहिती दिली आहे. गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्यासोबत झालेल्या बैठकीनंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.

गृहमंत्र्यांनी आढावा बैठक घेतली

“गृहमंत्र्यांनी कायदा आणि सुव्यस्थेच्या दृष्टीने आढावा बैठक घेतली. महाराष्ट्र पोलीस दल कायदा सुव्यस्थेचा प्रश्न हाताळण्यास सक्षम आहेत. आमची पूर्ण तयारी आहे. कोणत्याही परिस्थितीत कायदा बिघडू नये यासाठी आम्ही सर्वांना सूचना केल्या आहेत. याआधी समाजकंठक, गुन्हेगार स्वरुपाच्या लोकांवर मोठ्या प्रमाणात प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे,” अशी माहिती रजनीश सेठ यांनी दिली.

मनसेच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलीस अ‍ॅक्शन मोडमध्ये; पोलीस महासंचालकांनी दिला इशारा; म्हणाले “जातीय तेढ…”

“राज्यात शांतता, सुव्यवस्था ठेवण्यासाठी पोलिसांना सहकार्य करा”

“सामाजिक एकोपा राखण्यासाठी स्थानिक पातळीवर अनेक बैठका घेतल्या आहेत. एसआरपीएफ, होमगार्ड मोठ्या प्रमाणात संपूर्ण राज्यात तैनात करण्यात आले आहेत. कायद्याची अंमलबजावणी करणं पोलिसांची जबाबदारी आहे. कोणीही ते बिघडवण्याचा प्रयत्न केल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल. राज्यात शांतता, सुव्यवस्था ठेवण्यासाठी पोलिसांना सहकार्य करावं असं मी राज्यातील जनतेला आवाहन करतो,” असंही ते म्हणाले.

एसआरपीएफच्या ८७ तुकड्या आणि ३० हजारांपेक्षा जास्त होमगार्ड तैनात

“कोणीही जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केल्यास कडक कारवाई करु. आम्ही मोठ्या प्रमाणात प्रतिबंधक कारवाई केली असून नोटीस पाठवल्या आहेत. एसआरपीएफच्या ८७ तुकड्या आणि ३० हजारांपेक्षा जास्त होमगार्ड तैनात आहेत. कोणत्याही प्रकारे कायदा सुवयवस्था राखावी यासाठी त्यांना सूचना करण्यात आल्या आहेत,” असं रजनीश सेठ यांनी सांगितलं.

१५ हजार लोकांवर प्रतिबंधात्मक कारवाई

१५ हजार लोकांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आलेली असून १३ हजार लोकांना नोटीस पाठवण्यात आली असल्याची माहिती रजनीश सेठ यांनी दिली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

राज ठाकरेंवर कारवाई?

राज ठाकरेंच्या औरंगाबादमधील भाषणासंबंधी विचारण्यात आलं असता ते म्हणाले की, “औरंगाबादच्या पोलीस आयुक्तांनी भाषणाचा अभ्यास केला आहे. आवश्यक ती कारवाई करण्यासाठी ते सक्षम आहेत. जी कारवाई करायची आहे ती आजच केली जाईल. यासंबंधी कायदेशीर प्रक्रिया सुरु आहे”.