रत्नागिरी – महाराष्ट्र राज्यात रोबोटिक्स, कोडी आणि आर्टीफिशल इंटिलिजन्स तंत्र शिकणारी पहिली शाळा म्हणून दापोली तालुक्यातील केळशी जिल्हा परिषद शाळा क्र. १ या शाळेने मान पटकाविला आहे. या शाळेच्या प्रयोगशाळेचा उद्घाटन सोहळा नुकताच पार पडला. यामुळे विद्यार्थ्यांना आधुनिक युगाची ओळख दाखवणारे एक नवे दालन खुले झाले असल्याने शालेय विद्यार्थी आता रोबोटिक्स आणि एआयचे धडे गिरवू लागले आहेत.
पुणे येथील स्काय रोबोटीक्स संस्थेद्वारे सुरू करण्यात आलेल्या या प्रयोगशाळेच्या उद्घाटनप्रसंगी संस्थेचे संचालक अभिजीत सहस्त्रबुद्धे आणि कृष्णमूर्ती बुक्का उपस्थित होते. अध्यक्षस्थानी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष मनोज आंबेकर हे होते. हे तंत्र मुलांना कशा प्रकारे शिकवले जाईल याचे प्रात्यक्षिक गायत्री परांजपे यांनी दाखवले. कृष्णमूर्ती यांच्या संस्थेने हे तंत्र रोबोटिक कोडी, ए.आय. तंत्र, बांधकाम क्षेत्र व चित्रपट व्यवसायाच्या ठिकाणी वापरले आहे.
‘एआय’सह रोबोटिक धडे देणारी केळशी जि.प. शाळा राज्यातील पहिली शाळा ठरली आहे. महाराष्ट्रात प्रथमच एआय आणि रोबोटिक्सचे धडे या शाळेचे विद्यार्थी गिरवणार आहेत. या शाळेतील ई आय टिंकर लॅबमुळे विद्यार्थ्यांना नव्या युगाची ओळख होण्यास सुरुवात झाली आहे.
स्काय रोबोटिक्स, पुणे यांच्या माध्यमातून रत्नागिरी जिल्ह्यातील १५ माध्यमिक शाळांमध्ये रोबोटिक्स आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स शिकविले जात आहे. या शाळांमध्ये ईआय टिंकर लॅब सुरू झाल्या आहेत. या माध्यमातून पहिली ते सातवीचे विद्यार्थी एआय आणि रोबोटिक्सचे शिक्षण घेणार आहेत. गतवर्षीपासून रत्नागिरी जिल्ह्यात स्काय रोबोटिक्सने हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. पालक, शाळा आणि संस्थेच्या माध्यमातून शालेय विद्यार्थ्यांसाठी या नव्या उपक्रमाची सुरुवात झाली आहे. दापोली येथील गतीमंद विद्यालयातील विद्यार्थी देखील एआयचे धडे गिरवू लागले आहेत. त्यातून प्रेरणा घेत केळशी नं. १ शाळेचे मुख्याध्यापक संदीप तळदेवकर व ग्रामस्थांच्या लोकसहभागातून प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना प्रथमच एआय आणि रोबोटिक्स शिकविण्यास सुरुवात झाली आहे. या शाळेमध्ये पहिली ते सातवीपर्यंत ११५ विद्यार्थी असून त्यांच्यासाठी अद्ययावत १० संगणकांची लॅब तयार झाली आहे.

अशा लॅबमध्ये या क्षेत्रात तज्ज्ञ असणाऱ्या गायत्री परांजपे या विद्यार्थ्यांना शिकवणार आहेत. गायत्री प्रसाद परांजपे या वर्गाचे प्रशिक्षक म्हणून स्काय रोबोटिक्स तर्फे काम पाहणार आहे. ज्या केळशी गावच्याच रहिवाशी असून गावासाठी काहीतरी चांगले योगदान देण्याच्या इच्छेने पुणे येथील नोकरी सोडून केळशी येथे आलेल्या आहेत.
