छत्रपती संभाजीनगर : अतिवृष्टीमुळे त्रस्त मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर शहरात लक्ष्मीपूजनास पुन्हा पावसाच्या सरी पडल्या. पावसाच्या मोठ्या सरी आल्याने शहरातील बाजारपेठेत मोठी धावपळ झाली. दुपारच्या वेळी पडलेल्या पावसामुळे लक्ष्मीपूजनासाठी सामान खरेदी करण्यास गेलेल्या नागरिकांची तारांबळ उडाली.
आता पाऊस गेला, असे म्हणत दीपावलीची तयारी सुरू करण्यात आली. ग्रामीण भागात मात्र खरेदीचा फारसा उत्साह नव्हता. एरवी कपड्यांच्या दुकानात ग्रामीण भागातील नागरिकांची संख्या लक्षणीय दिसत असे. या वर्षी ती घटल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले. दरम्यान, पुन्हा लक्ष्मी पूजनास पावसाच्या सरी येऊन गेल्या.
हवामान विभागाने मराठवाड्यात पुन्हा पुढील पाच दिवस पावसाचा इशारा दिला आहे. त्यामुळे दिवाळीतही पाऊस पाठ सोडत नसल्याचे चित्र निर्माण झाले आहे. दीपावलीपासून पहाटे कडाक्याची थंडी सुरू होते. या वर्षी उकाडा कायम आहे. हवेत आर्द्रताही अधिक असून, पाऊस पुन्हा येईल, असे वातावरण निर्माण झाले आहे.
कोकण, विदर्भ, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांत पुन्हा मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. लातूर, नांदेड, परभणी, छत्रपती संभाजीनगर, बीड व धाराशिवमध्ये २५ ऑक्टोबरपर्यंत पाऊस येईल, असे हवामान विभागाकडून सांगण्यात येत आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये दुपारनंतर दीड ते दोन तास मुसळधार पाऊस झाला. त्यामुळे शहरातील अनेक सखल भागात पाणी आले. गुलमंडीसारख्या बाजारपेठेत पाणीच पाणी झाले. नांदेडमध्ये दुपारनंतर जोरदार पाऊस झाला. त्यामुळे लक्ष्मीपूजनाच्या दिवशी अनेकांची धांदल उडाली. सायंकाळी लक्ष्मीपूजनाच्या वेळेपर्यंत जोरदार पाऊस सुरू होता.