राज्याचे मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी काल मुंबईमधील बीकेसी मैदानात सभा घेतली. या सभेमध्ये उद्धव ठाकरेंनी भाजपावर हिंदुत्वाच्या मुद्द्यावरुन सडकून टीका केली.  या सभेत मुख्यमंत्री ठाकरे यांनी भाजपचे हिंदुत्व, केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर त्याचबरोबर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि मनसे प्रमुख राज ठाकरे यांचा समाचार घेतला. उद्धव ठाकरेंच्या यासभेला फडणवीस यांनी रविवारी गोरेगावातील नेस्को मैदानावर हिंदी भाषी महासंकल्प सभेमधील भाषणातून टीका केली. फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधताना उपमुख्यमंत्री अजित पवारांसोबतच्या पहाटेच्या शपथविधीचा मुख्यमंत्र्यांनी केलेल्या उल्लेखाचाही समाचार घेतला.

नक्की वाचा >> मुख्यमंत्र्यांना पहाटेच्या शपथविधीची आठवण झाल्याचा प्रश्न ऐकून अजित पवार चिडले; हात जोडून म्हणाले, “…तर तुम्ही धन्यच आहात”

उद्धव ठाकरे काय म्हणाले होते?
भाजपावर निशाणा साधताना उद्धव ठाकरेंनी, “देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात भाजपाची मातृसंस्था असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा सहभाग नव्हता. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत समितीतून सर्वात प्रथम जनसंघवाले फुटले. शिवसेनेची पंचवीस वर्षे युतीमध्ये सडली. त्यानंतर यांचा हिंदुत्वाचा बुरखा फाटला आणि यांचा भेसूर चेहरा सर्वाना दिसला,” असा टोला लगावला. त्यानंतर पहाटेच्या शपथविधीचा उल्लेख करत भाजपावर निशाणा साधला. “आम्ही काँग्रेससोबत जाऊनही हातातला भगवा सोडला नाही. आम्ही जे केले ते उघडपणे केले. पण तुमचा पहाटेचा शपथविधी यशस्वी झाला असता तर नवाब मलिक आणि अनिल देशमुख तुरुंगात नव्हे तर भाजपवाल्यांच्या मांडीला मांडी लावून बसले असते,” असा टोला उद्धव ठाकरेंनी लगावला.

फडणवीसांनी दिलं उत्तर
उद्धव ठाकरेंनी आपल्या भाषणात उल्लेख केलेल्या या पहाटेच्या शपथविधीच्या मुद्द्यावरुन फडणवीसांनी त्यांना टोला लगावला. “सकाळचा शपथविधी यशस्वी झाला असता, तर माझ्या मंत्रिमंडळातील कुण्या अनिल देशुमख किंवा नवाब मलिकची हिंमत झाली नसती,” असा टोला फडणवीस यांनी लगावला. “ज्या दिवशी दाऊदच्या सहकार्‍यासोबत बसायची वेळ आली असती, त्यादिवशी सत्तेला ठोकर मारून घरी बसलो असतो,” असंही फडणवीस म्हणाले.

तुमच्यासारखा सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्माला आलो नाही
अयोध्येला गेलो तेव्हा मी नगरसेवक आणि वकील होतो, असे सांगत गोळय़ा-लाठय़ांची पर्वा न करता अयोध्या आंदोलनात गेलो होतो. बाबरी पाडायला गेलो होतो. तुम्हाला मिर्ची का लागली, असा सवाल फडणवीस यांनी एका गाण्याचे बोल वापरत केला. मी जमिनीशी-सामान्य लोकांशी जोडलेला कार्यकर्ता आहे म्हणून या स्थानापर्यंत आलो. तुमच्यासारखा सोन्याचा चमचा तोंडात घेऊन आलो नाही. माझ्या पाठीत खंजीर खूपसून माझे राजकीय महत्त्व कमी कराल, हे विसरून जा. तुमच्या सत्तेचा ढाचा पाडल्याशिवाय गप्प बसणार नाही, असा इशारा दिला.