राज्यात सध्या मराठा, ओबीसी, धनगर समाजाकडून आरक्षणाची मागणी केली जात आहे. ही मागणी रास्तच आहे. भाजपानं २०१४ पासून या समाजांना आरक्षण देण्याचं पोकळ आश्वासन दिलं आहे. केंद्रात व राज्यात भाजपाचे सरकार असूनही त्यांनी कोणत्याच समाजाला आरक्षण दिलेले नाही. भाजपानं या समाजाची फसवणूक केली, अशी टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे.

“आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावायचा असेल तर जातनिहाय जनगणना केली पाहिजे. काँग्रेस सत्तेत आल्यानंतर जातनिहाय जनगणना होईल आणि आरक्षणाचा प्रश्नही मार्गी लावेल, असा विश्वास नाना पटोलेंनी व्यक्त केला. ते टिळक भवन येथे प्रसारमाध्यमांशी संवाद साधत होते.

हेही वाचा : “माजी मुख्यमंत्री कुणी केलं, हे…”, श्रीकांत शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल

“फडणवीस मराठा आणि मराठा समाजाची फसवणूक करत आहेत”

“मागील काही दिवसांपासून आरक्षणाचा प्रश्न पेटलेला आहे. आरक्षणावरून दोन समाजात वाद निर्माण करुन राजकीय पोळी भाजण्याचे पाप भाजपा करत आहे. ‘ओबीसींच्या आरक्षणाला हात लावणार नाही,’ असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नागपूरमध्ये सांगतात. तेच फडणवीस ‘मराठा आरक्षण मीच देऊ शकतो,’ अशी वल्गणा करतात. पण, प्रत्यक्षात दोन्ही समाजाची ते दिशाभूल करत आहेत,” असा आरोप नाना पटोलेंनी केला.

“काँग्रेस सत्तेवर आल्यास जातनिहाय जनगणना करणार”

“आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावायचा असेल, तर केंद्र सरकार तातडीने करु शकते. जातनिहाय जनगणना हा त्यावरील महत्वाचा मार्ग आहे. पण, भाजपाचा जातनिहाय जनगणनेस विरोध आहे. मल्लिकार्जुन खर्गे, सोनिया गांधी आणि राहुल गांधींनी जातनिहाय जनगणना करण्याची मागणी केलेली आहे. काँग्रेस सत्तेवर आल्यास जातनिहाय जनगणना करण्याचे आश्वासनही दिलेले आहे,” असं नाना पटोलेंनी सांगितलं.

“मंत्रीमंडळ बैठकीत दुष्काळावर चर्चा नाही”

“राज्यातील अनेक भागात कमी पाऊस पडलेला आहे. मराठवाड्यातील परिस्थिती गंभीर आहे. ७ तारखेपासून महाराष्ट्राचा दौरा करुन आम्ही परिस्थिती पाहिली. लोकांशी संवाद साधला. पिण्याचे पाणी, जनावरांचा चारा यासह अनेक प्रश्न आहेत. शेतकरी, कामगार, सर्वसामान्य लोक त्रस्त आहेत, सरकारने दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी होत आहे. पण, सरकारला त्याचे काहीच गांभीर्य नाही. दोन-तीन मंत्रीमंडळ बैठका झाल्या. मात्र, त्यात दुष्काळावर चर्चा सुद्धा झाली नाही. या येड्याच्या सरकारला जनतेचं काहीही देणेघेणे नाही,” असं टीकास्र नाना पटोलेंनी डागलं.

हेही वाचा : “मिंधे गटातील १३ पैकी १० खासदारांचं विसर्जन होणार, लोकसभेआधी…”, ठाकरे गटातील नेत्याचं मोठं विधान

“वाघनखे आणतो म्हणून जनतेच्या पैशावर…”

“एक मंत्री सत्कार करुन घेण्यात मग्न आहेत. तर, दुसरे मंत्री छत्रपती शिवाजी महाराज यांची वाघनखे आणतो म्हणून जनतेच्या पैशावर ‘लंडन पर्यटन’ करुन आले आणि स्वतःचाच सत्कार करुन घेत फिरत आहेत,” अशी टीकाही नाना पटोलेंनी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यावर केली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“लोक घरातही आणि बाहेरही सुरक्षित नाहीत”

“समृद्धी महामार्गावर वैजापूर येथे अपघात होऊन १२ लोकांचा मृत्यू झाला ही अत्यंत दुःखद घटना आहे. मागील ९ महिन्यात समृद्धी महामार्गावर ८६० अपघात झाले. त्यात एक हजार लोक मरण पावले आहेत, जखमीही झाले आहेत. अपघात झाले की सरकार चौकशी करण्याची घोषणा करते, अशा किती चौकशा करणार? आणि याआधी घोषणा केलेल्या चौकशांचे काय झाले? याचे उत्तर आधी द्या. या महामार्गाने कोणाची समृद्धी झाली हे सर्वांना माहित आहे. भाजपाप्रणित शिंदे सरकारच्या काळात लोक घरातही सुरक्षित नाहीत आणि बाहेर रस्त्यावर आले, तर रस्त्यावरही सुरक्षित नाहीत,” अशी संतप्त प्रतिक्रिया नाना पटोलेंनी व्यक्त केली.