सातारा : राज्यामध्ये नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी राष्ट्रीय नैसर्गिक शेती मिशन ही महत्त्वाकांक्षी योजना सन २०२४-२५ पासून राबविण्यात येत आहे. या मिशनची अंमलबजावणी भारत सरकारच्या कृषी व शेतकरी कल्याण विभाग व कृषी विभाग, महाराष्ट्र शासन यांच्यामार्फत करण्यात येत आहे. शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च कमी करणे, बाह्य निविष्ठा खरेदी न करणे, निसर्गावर आधारित शाश्वत शेतीप्रणाली विकसित करणे, मातीचे आरोग्य आणि सुपीकता पुनरुज्जीवित करणे, पाण्याची गुणवत्ता वाढवणे, जैवविविधता जतन करणे आणि शेतकरी त्यांचे कुटुंब आणि ग्राहकांना सुरक्षित, आरोग्यदायी आणि पौष्टिक अन्न पुरवणे हे मुख्य मिशनचे उद्दिष्ट आहेत.
योजनेत केंद्राचा हिस्सा ६० टक्के व राज्याचा हिस्सा ४० टक्के या प्रमाणात निधी मंजूर आहे. योजनेंतर्गत ५० हेक्टर क्षेत्राचा एक गट असे एकूण ५४ गट (२७०० हेक्टर क्षेत्र) १० तालुक्यांतून निवडण्यात आलेले आहेत. प्रति शेतकरी १ एकर क्षेत्र याप्रमाणे एकूण ६ हजार ७५० शेतकरी निवड करण्याची कार्यवाही सुरू आहे.
प्रतिगट २ कृषी सखी अशा एकूण १०८ कृषी सखींची निवड करण्यात आलेली आहे. निवडलेल्या कृषी सखींना कृषी विज्ञान केंद्रात प्रशिक्षण देण्यासाठी जिल्ह्यात एकूण २ केव्हीके- कृषी विज्ञान केंद्र, बोरगाव, ता. जि. सातारा व कृषी विज्ञान केंद्र, कालवडे, ता. कराड यांची निवड करण्यात आलेली आहे.
नैसर्गिक शेती करणाऱ्या इच्छुक शेतकऱ्यांसाठी अभ्यास साहित्य, फार्म डायरी, पुस्तिका इ. उपलब्ध करून देण्यात येणार आहे. निवड केलेल्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनासाठी रक्कम चार हजार रुपये प्रतिएकर प्रतिवर्ष याप्रमाणे २ वर्षांसाठी अनुदान देय असणार आहे. कृषी सखी यांना मानधन रक्कम पाच हजार रुपये प्रतिमाह याप्रमाणे दोन वर्षांसाठी तरतूद आहे. कृषी सखी यांना मोबाइल उपकरणांसाठी मदत मिळणार आहे.
अधिक माहितीसाठी शेतकऱ्यांनी प्रकल्प संचालक, आत्मा कार्यालय, नवीन प्रशासकीय इमारत, तिसरा मजला, हजेरी माळ, सातारा येथे किंवा ०२१६२-२२६८२२ या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा.