शिवसेना पक्षाचा ५८ वा वर्धापन दिन बुधवारी पार पडला. शिवसेनेतील फूटीनंतर दोन वेगवेगळे वर्धापन दिन साजरे करण्यात आले. शिवसेना शिंदे गटाचा वर्धापन दिनाचा कार्यक्रम वरळीत पार पडला. या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात बोलताना शिवसेना शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाबाबत बोलताना देवेंद्र फडणवीसांना उद्देशून भाष्य केलं की, अजित पवार थोडे दिवस आले नसते तरीही चाललं असतं. आता त्यांच्या या विधानाला राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते अमोल मिटकरी यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. “अजित पवार हे महायुतीमध्ये वेळेत आले म्हणून तुमची लंगोट वाचली. अन्यथा हिमालयात जावं लागलं असतं”, असा टोला अमोल मिटकरींनी रामदास कदमांना लगावला आहे.

अमोल मिटकरींनी काय म्हटलं?

“रामदास कदमजी आपण जोरात बोललात की, मागून आलेले अजितदादा थोडे उशिरा आले असते तर बरं झालं असतं. माहितीसाठी सांगतो ते वेळेत आले म्हणून तुमची लंगोट तरी वाचली. उशिरा आले असते तर हिमालयात जप करायला जावं लागलं असतं. दादांची कृपा म्हणून तुम्ही वाचलात हे विसरू नका”, अशा शब्दात अमोल मिटकरी यांनी रामदास कदम यांना प्रत्युत्तर दिलं आहे.

हेही वाचा : “अजित पवार थोडे दिवस नसते आले तर…”, शिंदे गटाचा देवेंद्र फडणवीसांना घरचा आहेर!

रामदास कदम काय म्हणाले होते?

शिवसेना पक्षाचा वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात बोलताना रामदास कदम यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमोरच अजित पवार गटाबाबत मोठं भाष्य केलं. रामदास कदम हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना उद्देशून म्हणाले, “फडणवीस साहेब धन्यवाद. मात्र, अजित पवार थोडे दिवस महायुतीत आले नसते तर चालले असते.” अशा शब्दात रामदास कदम यांनी अजित पवार गट महायुतीत आल्याने अशा पद्धतीने नाराजी त्यांनी बोलून दाखवल्याने चर्चांना उधाण आलं आहे. दरम्यान, त्यांच्या या विधानानंतर अजित पवार गटाकडून प्रतिक्रिया आता येत आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा महायुतीच्या नेत्यांमध्ये धुसफूस सुरू होण्याची शक्यता आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मुख्यमंत्री शिंदेंची ठाकरे गटावर टीका

शिवसेना पक्षाच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्री शिंदेंनी ठाकरे गटावर हल्लाबोल केला. ते म्हणाले, “शिवसेना काँग्रेसच्या दावणीला बांधली. काँग्रेसच्या दावणीला बांधलेली शिवसेना सोडवण्यासाठी आणि बाळासाहेब ठाकरे यांचे विचार जपण्यासाठी दोन वर्षापूर्वी आपण उठाव केला. तो उठाव योग्य होता हे या निवडणुकीमध्ये जनतेने दाखलं. आपण घेतलेला निर्णय कसा योग्य होता. हे आपण निवडणुकीमध्ये पाहिलं. जनतेच्या विश्वासाला आपण कधाही तडा जाऊ देणार नाही, हा शब्द मी देतो”, असं एकनाथ शिंदे म्हणाले.