रत्नागिरी :   राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपचे काही लोकप्रतिनिधी, नेते लवकरच शिवसेनेत प्रवेश करणार असून येत्या काही दिवसांत कोकणातील तिन्ही जिल्ह्यात आपण राजकीय धमाका करणार असल्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी गुरूवारी येथे आयोजित पत्रकार परिषदेत जाहीर केले.   राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जलसंपदामंत्री जयंत पाटील सध्या रत्नागिरी जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून गेले दोन दिवस त्यांचे तालुकावार बैठका—मेळावे चालू आहेत. याबाबत टिप्पणी करताना सामंत म्हणाले की, राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असले तरी अघाडीतील तिन्ही पक्षांना आपापला पक्ष वाढविण्याचा अधिकार आहे . महाविकास आघाडी स्थापन करतानाच तशी चर्चा झाली होती . त्यामुळे जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष विस्ताराचे प्रयत्न करत असेल तर त्यामध्ये चुकीचे काहीही नाही .  राज्यातील प्रत्येक भागात प्रत्येकाला पक्ष वाढविण्याचा अधिकार आहे. त्याप्रमाणे प्रत्येकजण आपापले काम करत आहे.

आगामी निवडणूका स्वबळावर की आघाडी करुन लढायच्या, हे पक्षाचे वरिष्ठ नेते ठरवतील . मात्र पक्ष वाढवायला कोणत्याही अटी—शर्ती नाहीत. त्यामुळे येत्या काही दिवसात कोकणात मोठा राजकीय धमाका होणार आहे . रायगड , रत्नागिरी आणि सिंधुदुर्गमधील राष्ट्रवादी , भाजपचे कार्यकर्ते , नेते व लोकप्रतिनिधी शिवसेनेत प्रवेश करणार आहेत  आमचीही तारीख ठरलेली आहे. पुढील महिन्यात १६ नोव्हेंबर रोजी आपण रायगड जिल्ह्याच्या दौऱ्यावर जाणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

‘मिशन युवा स्वास्थ अभियाना’च्या शुभारंभासाठी मंत्री सामंत रत्नागिरीतील नवनिर्माण महाविद्यालयामध्ये आले होते. या संदर्भात  ते म्हणाले की, राज्य शासनातर्फे महाविद्यलयातील विद्यार्थ्यांंना मोफत लस देण्यात येत आहे. यासाठी मिशन युवा स्वास्थ्य अभियान राबविले जात आहे . त्याला रत्नागिरी जिल्ह्यात अल्प प्रतिसाद मिळाला. लसीकरणाबाबत मित्र — मैत्रिणींमध्ये जनजागृती करून विद्यार्थ्यांंचे शंभर टक्के लसीकरण करून घेणे आवश्यक आहे. जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्था जास्त मजबूत करण्यासाठी आपण प्रयत्नशील आहोत. आठ नव्या प्राणवायूनिर्मिती प्रकल्पासह डायलेसिस उपचार केंद्रही कार्यान्वित करण्यात येणार आहे.

करोनाचा प्रादुर्भाव संपला तरीही नियमित रुग्णांना जिल्हा रुग्णालयात जावे लागू नये, त्यांना ग्रामीण भागातील रूग्णालयात प्राणवायू उपलब्ध व्हावा, या उद्देशाने हे प्रकल्प सुरू करण्यात आले आहेत. यापुढे रत्नगिरीतून उपचारासाठी बाहेर जायला लागू नये यासाठी आपण प्रयत्न  करत आहोत.