महत्त्वाकांक्षी भास्कर जाधव यांना तटकरेंचे ‘सामाजिक’ उत्तर ! ; उत्तर रत्नागिरीत कुणबी अस्मितेचा मुद्दा ऐरणीवर

मुंबईतील कुणबी समाज वसतिगृह उभारणीसाठी दिलेले पाच कोटी रूपये या वर्चस्वाला शह ठरण्याची चिन्हे आहेत.

राजगोपाल मयेकर

दापोली : राष्ट्रवादीचे खासदार सुनील तटकरे यांनी कुणबी मुद्दय़ावरून शिवसेना आमदार भाकर जाधव यांच्यावर निशाणा साधत आगामी निवडणुकांचा अजेंडा आतापासूनच स्षष्ट केला आहे. या कुणबी अस्मितेचा मुद्दा लोकसभा—विधानसभा निवडणुकीपर्यंत कायम राहण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

मुळात भास्कर जाधव मराठा समाजाचे दीग्गज नेते असून ते मागील लोकसभा निवडणुकीलाच तटकरे यांच्या विरोधात रायगड मतदारसंघातून शिवसेनेतर्फे उमेदवारी मिळविण्यासाठी प्रयत्नशील होते. मात्र त्यावेळी तत्कालिन खासदार अनंत गीते यांनाच पक्षश्रेष्ठींनी पसंती दिली. त्या निवडणुकीत गीते यांचा अनपेक्षित पराभव झाला आणि रायगडमध्ये त्यांच्या रूपाने जपले जाणारे ‘कुणबी कार्ड’ संपुष्टात आले. पण कुणबी समाजाचे नेते म्हणून गीते यांचा प्रभाव आजही अनन्यसाधारण आहे.

दरम्यान, काही महिन्यापूर्वी मुंबईतील कुणबी समाज वसतिगृह उभारणीसाठी दिलेले पाच कोटी रूपये या वर्चस्वाला शह ठरण्याची चिन्हे आहेत. विशेष म्हणजे त्यानंतर दापोली विधानसभा मतदारसंघातील कुणबी नेत्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्याने राजकीय हालचालींना वेग आला. त्यावरून भास्कर जाधव यांनी नुकतेच पाच कोटींचे आमिष दाखवून सुनील तटकरे यांनी कुणबी समाजातील नेत्यांना आपल्याकडे वळवल्याचे विधान केले. याबाबत दापोलीतील कार्यालयाच्या  उदघाटनप्रसंगी शनिवारी तटकरे यांनी उत्तर दिले. पक्षप्रवेश हे आमिष दाखवून केले जाते, अशी भूमिका शिवसेनेतून राष्ट्रवादी व राष्ट्रवादीतून शिवसेनेत गेलेल्या भास्कर जाधवांनी मांडणे, हे हास्यास्पद आहे. त्यांचे हे वक्तव्य कुणबी समाजाचा अपमान करणारे आहे, अशी टीका तटकरे यांनी यावेळी केली.

मुळात यापूर्वीच्या निवडणुकीत मराठा समाजाचे नेते सूयकांत दळवी यांचा पराभव कुणबी सामाजिक असंतोषामुळेच झाला. त्यावेळी तब्बल १५ हजार मतं मिळवणारे अपक्ष कुणबी नेते कै. शशिकांत धाडवे हेच दळवी यांच्या निसटत्या पराभवाला कारणीभूत ठरले. पण या असंतोषाची ठिणगी पेटली होती, ती दीग्गज शिवसेना नेते रामदास कदम यांच्या गीते यांच्याविषयीच्या सामाजिक वक्तव्यामुळे. त्याचा फटकाच जणू सूर्यकांत दळवी यांना बसला आणि पुढच्या निवडणुकीत योगेश रामदास कदम यांच्या उमेदवारीचा मार्ग मोकळा झाला. त्यानंतर हा कुणबी अस्मितेचा एल्गार अंधूक झाला. राष्ट्रवादीचे नेते आमदार संजय कदम आणि योगेश कदम हे दोघेही मराठा समाजाचे नेते आहेत. आधीच्या निवडणुकीत सूर्यकांत दळवी यांना पराभूत करणारे संजय कदम यांना पुढील निवडणुकीत योगेश कदम यांनी चीतपट केले. आता अनिल परब यांच्या वादग्रस्त बांधकाम प्रकरणावरून प्रसारित झालेल्या दूरध्वनी संभाषण क्लीपनंतर शिवसेनेत रामदास कदम यांच्याविरोधात वातावरण तयार केले जात आहे. त्यामुळे चिपळूणनंतर गुहागर मतदारसंघातील उमेदवारीची राजकीय आव्हानं यशस्वी करून दाखविणाऱ्या भास्कर जाधव यांच्या उत्तर रत्नागिरी आणि पर्यायाने रायगड लोकसभा मतदारसंघातील महत्त्वाकांक्षांना अधिक बळ मिळू लागले आहे. विशेष म्हणजे राष्ट्रवादीचे माजी आमदार संजय कदम यांनी नुकतीच जाधव यांची भेट घेऊन त्या महत्त्वाकांक्षेला दुजोराही दिला. साहजिकच सुनील तटकरे  यांनी कुणबी समाजाच्या अस्मितेचा प्रश्न ऐरणीवर आणून सामाजिक समीकरणं मांडण्यास सुरूवात केली आहे. हा मुद्दा आता लोकसभा—विधानसभा  निवडणुकीपर्यंत कायम ठेवला जाण्याची शक्यता राजकीय निरीक्षकांनी वर्तविली आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Ncp mp sunil tatkare targets shiv sena mla bhakar jadhav over kunbi issue zws

ताज्या बातम्या